फडणवीस, मुनगंटीवारांची बॅटिंग अन् भाजपमध्ये एकी

Sudhir Mungantiwar-Devendra Fadnavis

भाजपमध्ये भाजपमध्ये विसंवाद वाढत असल्याची टीका होत असतानाच विधानसभेत मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटी (Chandrakant Patil) आणि अमित साटम (Amit Samat) यांनी सरकारला घेरले. भाजपच्या बाकांवर सुसंवाद सुरू झाल्याची ही नांदी म्हणायला हवी.

सुधीर मुनगंटीवार यांनी खुमासदार शैलीत बॅटिंग केली. सरकारमधील मंत्र्यांचा ४३ चा कोटा फुल्ल झाला आहे. आता तरी सरकार नावाच्या गाडीने पहिला गिअर टाकावा, अशी अपेक्षा असल्याचे सांगत त्यांनी हल्लाबोल केला. आदिवासींना निकृष्ट वाटाणे वाटणाऱ्या सरकारच्या हातावर जनता फुटाणे दिल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना द्यायला सरकारजवळ पैसा नाही; पण वाईन उद्योगाला ५० कोटी दिले, ‘वाईन और जिंदगी फाईन’ असे चालले आहे. राज्य सरकारने कर्ज काढून कोरोना काळात लोकांना मदत करायला हवी होती. नियमानुसार अजूनही १ लाख ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज काढता येते; पण लोकांना मदतीची सरकारची मानसिकताच नाही.

साडेबारा लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी चार हजार रुपयांची मदत डीबीटीद्वारे का केली नाही? त्यातील दोन हजार रुपयांच्या वस्तू देणे म्हणजे भ्रष्टाचाराला आमंत्रण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वस्तू देण्याला विरोध होता, असा दावा करीत मुनगंटीवार यांनी या मुद्यावर सरकारमध्ये विसंवाद असल्याचे सांगितले. अजब सरकार की गजब कहानी चालू आहे. तुम्ही २५ वर्षे सरकार चालवू म्हणता, २५ नाही २०६० पर्यंत म्हणजे महाराष्ट्र शंभर वर्षांचा होईपर्यंत सरकार चालवा; पण साडेबारा कोटी जनतेचे हाल होत असतील तर अशा सरकारचा फायदा काय, असा सवाल त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त सरकारने काढलेल्या ‘महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही’ या पुस्तिकेवरून उपरोधिकपणे हल्ला करताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘घोषणा थांबणार नाही, अंमलबजावणी होणार नाही’ अशी या सरकारची अवस्था असल्याची टीका केली.

फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. त्याचा उल्लेख करून, खुशाल चौकशी करा, असे आव्हान त्यांनी दिले. या योजनेत पाच लाख कामे झाली, केवळ ७०० कामांबाबत तक्रारी आहेत, ज्यांची चौकशी सरकार करणार आहे. आता नमुन्यादाखल आम्ही पाच हजार गावांचे अर्थकारण या योजनेने कसे बदलले याची पुस्तिका काढणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय, राज्यात कोरोनाशी संबंधित खरेदी आणि कामांमध्ये मोठे घोटाळे झाल्याचे सांगून त्यांनी याबाबतही आपण लवकरच पुस्तिका काढणार असल्याचे ते म्हणाले. कंगना रनौत, अर्णव गोस्वामी हे अनुक्रमे महाराष्ट्र-मुंबई आणि मुख्यमंत्र्यांविषयी ज्या पद्धतीने बोलले त्याच्याशी आपण मुळीच सहमत नसल्याचे फडणवीस म्हणाले. मात्र, या दोघांविरुद्ध राज्य सरकारने आकसाने कारवाई केली, असे मत व्यक्त करून ते म्हणाले की, न्यायालयानेही तसेच मत व्यक्त केले आहे.

मुंबईतील मेट्रो कारशेड आरेमधून कांजूरमार्गला हटविल्यामुळे मेट्रो प्रकल्प चार वर्षे रखडेल आणि अतिरिक्त पाच हजार कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडेल. या प्रकल्पाला अर्थसाहाय्य करणारी जायका कंपनी हा अतिरिक्त भार उचलणार नाही, केंद्र सरकारही उचलणार नाही. राज्य सरकारला हा जास्तीचा पैसा मोजावा लागेल, असे ते म्हणाले. विरोधी पक्षांना पुरवणी मागण्यांवरील चर्चेसाठी चार तास सभागृहात मिळाले. त्याचा पुरेपूर फायदा घेत फडणवीस, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांनी सरकारला घेरण्याची चांगली संधी शोधली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER