फडणवीस यांनी केले महाआघाडी सरकारला बोलके…

Grand Alliance Government

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रपरिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर जी तोफ डागली तिचा नेम बरोबर जाऊन बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची तातडीने बैठक घेतली. फडणवीसांनी मांडलेल्या मुद्द्यावर प्रचंड खल झाला आणि ते मुद्दे कसे फोडून काढायचे याची रणनीती ठरली. दोन-अडीच तासांच्या बैठकीत फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर कसे द्यायचे एवढाच विषय होता.

कारण जीएसटीचा पैसा केंद्र सरकार देत नाही एवढेच एक तुणतुणे लावत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकार राज्याला मदत करीत नसल्याचे आभासी चित्र निर्माण केले होते.फडणवीस यांनी त्या चित्राचा पूर्ण बुरखा फाडून टाकला. विविध योजनांतर्गत केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांची केलेली मदत कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्राकडून येत असलेला मदतीचा ओघ,स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने केलेला प्रचंड खर्च व त्या तुलनेत राज्याने उचललेला खारीचा वाटा याबाबतची वस्तुस्थिती फडणवीस यांनी मांडली.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादीकाँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार असले तरी गेले काही महिने शिवसेना व राष्ट्रवादी आणि त्यातही मुख्यत्वे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच सरकार चालवित असल्याचे वाटत होते.

कॉंग्रेसला कोणी विचारत नाही अशी स्थिती होती. मात्र यासंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली नाराजी आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केलेले आरोप यामुळे बैठकीच्या निमित्ताने तिन्ही पक्षांना बैठकीच्या निमित्ताने बुधवारी एकत्र यावे लागले तसेच पत्रपरिषदेलादेखील एकत्रितपणे सामोरे जावे लागले.

विरोधी पक्षाने कितीही राजकारण केले तरी आम्ही राजकारण करणार नाही, ती आमची संस्कृती नाही.लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते. परंतु महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीने फडणवीस यांच्याबाबत भाषा वापरण्यात आली त्यात राजकारण नव्हते का ?

राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या नाराजीचा परिणाम बरोबर झाला. राहुलजी तसेच काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराज नाही हे दाखवण्याची बुधवारी खूपच धडपड करण्यात आली. तिन्ही पक्षांची बैठक हा त्याचाही एक भाग होता. तसेच राहुल गांधी -उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा मॅनेज करण्यातही यश आले.

हे लिहिता लिहिता एक धक्कादायक माहिती हाती आली. ती अशी की राज्यात आज बुधवारी कोरोनाचे १०५ बळी गेले. कोरोनाच्या मृत्यूसंख्येने एका दिवसात पहिल्यांदाच शतक ओलांडले. रोजच्यारोज वाढणारी रुग्णांची संख्या आणि मृतकांचे वाढणारे आकडे हे कोणाचे अपयश म्हणायचे?

कोरोनाच्या विषयावरून राजकारण व्हायला जनतेला नको आहे. परिस्थिती नियंत्रणात आली पाहिजे, त्यासाठी प्रभावी उपायोजना करायला हव्यात ही जनतेची अपेक्षा आहे. त्या अपेक्षांची पूर्तता केली तर सरकारची प्रतिमा आपोआपच उजळून निघेल त्यासाठी विरोधी पक्षाच्या प्रमाणपत्राची गरज राहणार नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER