मुख्यमंत्री फडणवीस हेच शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे खरे वारसदार : महादेव जानकर

CM Jankar

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली आहे . या पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली नातेपुते येथे नुकताच पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी संबोधित करताना जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले .

विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार निशाणा साधला जातो . अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विरोधक त्यांच्यावर टीका करतात . मात्र मुख्यमंत्री हे शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार आहेत. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका करू नये , असे विधान महादेव जानकर यांनी केले आहे . तसेच विधानसभेसाठी आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील ४ जागा मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली .

रासपची शक्ती वाढल्यामुळे घटक पक्षांमध्ये मोठा भाऊ आपण असणार आहोत . ‘भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीच्या जागावाटप मध्ये सरकार सोबत असलेल्या शिवसंग्राम, आरपीआय, रयत क्रांती संघटना यांच्यासाठी १८ जागा देण्याचा निर्णय युतीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचेही ते म्हणाले .