फडणवीस देताहेत इशारा काटेरी वाटेचा…

Devendra Fadnavis - MahaVikas Aghadi

Shailendra Paranjapeमाजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या तीन पक्षांच्या पांगुळगाड्यातल्या निर्णयक्षमतेच्या आणि घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीच्या उणिवांवर नेमकेपणानं बोट ठेवलंय. झूमद्वारे प्रेस कॉन्फरन्स घेताना त्यांनी पत्रकार परिषदेचा विषय मोदी सरकारची दुसऱ्या टर्ममधली वर्षपूर्ती हा विषय ठेवला असल्यानं मोदी सरकारची वर्षभरतली कामं साद्यंत सांगितली. पण त्याबरोबरच ते आणि आम्ही यातला फरकही स्पष्टपणे दाखवून दिला.

सांगली कोल्हापूरच्या पुराच्या वेळी १४लाख लोकांना विस्थापित करावं लागलं होतं आणि कालच्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याच्या वेळी केवळ पन्नास हजार लोकांनाच हलवावं लागलंय, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्याबरोबरच निकषांच्या बाहेर जाऊन आणि खिशात वा तिजोरीत पैसा नसतानाही राज्य सरकारला आपल्या प्रजेसाठी, जनतेसाठी अनेकदा पैसे उभे करावे लागतात. किंबहुना ते राज्याचं कर्तव्यचं असतं, हेही त्यांनी बजावलंय.

अगदी पंजाबमधल्या अमरिंदर सिंग यांच्या कॉँग्रेसच्या सरकारनंही केंद्र सरकारची विशेष परवानगी घेऊन कर्ज घेतलंय आणि राज्यातल्या जनतेची आबाळ थांबवलीय पण महाराष्ट्र सरकार मात्र एकीकडं कर्ज घ्यायचं नाही, राज्याची आर्तिक स्थिती चांगली नाही, असं सांगत आपली जबाबदारी टाळायची आणि केंद्र सरकारच्या नावानं बोटं मोडायची इतकंच करतंय, हेही त्यांनी सोदाहरण पटवून दिलं. करोनासारख्या संकटानंतर किमान सहा महिने अर्थव्यवस्था सुधारणार नाही, हे लक्षात घेऊन नियोजन करायला हवं, असं सांगतानाच उत्तर प्रदेश किंवा ओरिसानंही सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापलेले नाहीत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलंय.

मुंबईमधे खासगी रुग्णालयातल्या ८० टक्के खाटा कोविड वा करोनासाठी ताब्यात घेऊ असं सरकार म्हणतंय पण प्रत्यक्षात अनेक रुग्णालयांनी आपला इन्फ्लुअन्स वापरून त्यातून मान सोडवून घेतलीय, असा आरोप फडणवीस यांनी केलाय. त्याबरोबरच राज्य सरकार निर्णय घेतंय पण प्रत्यक्ष जमिनीवर अंमलबजावणी बघितली तर घोषणा आणि वस्तुस्थिती यात तफावत असल्याचं निदर्शनास येतं, हेही त्यांनी सांगितलं. सरकारमध्या तीनही पक्षांचा परस्परसंवाद नाही आणि त्यांचा एकत्रितपणे अधिकाऱ्यांशी संवाद नाही, यावरही फडणवीस यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याच्या वृत्ताबद्दल, सर्वेक्षणाबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, हे सर्वेक्षण कुणी केलंय मला माहीत नाही. मी ते पाहिलेलं नाही पण मुंबईमधल्या लोकांच्या सोशल मिडियावरच्या प्रतिक्रिया बघितल्यात तर तुम्हाला लक्षात येईल की लोकप्रियता किती आहे ते… अशी टिप्पणी करून फडणवीस यांनी त्यांच्या खास शैलीत, उद्धव ठाकरे यांना मझ्या शुभेच्छा आहेत, असंही सांगितलं.

पीपीइ किट्स असोत की आयसोलेशन केंद्र सुरू करण्याची कारवाई, त्यात जे काही प्रकार चालू आहेत, त्यावर आपण संकटाच्या काळात बोलणार नाही ण नंतर यावर बोलणार आहोत, असं सूतोवाचही फडणवीस यांनी केलंय. संकटकाळात आपत्कालीन स्थितीत निविदा प्रक्रियेला फाटा देऊन खरेदी प्रक्रिया करण्याची मुभा असते पण सध्या जे काही चालू आहे, ते लक्षात घेता राज्यात परिस्थिती वाईट आहे आणि मुंबईत तर जनतेला खासगी रुग्णालयांच्या भरोशावर सोडून चाचण्याच कमी करण्यात आल्यात, याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय.

फडणवीस यांनी उद्योगधंदे पुन्हा सुरू करतानाही काय काळजी यायला हवी, हे सांगितलंय. उद्योगांमधे वा नव्या येणाऱ्या गुंतवणुकीच्या वेळी आमचे लोक घ्या आणि आम्हाला कंत्राटं द्या, हे आग्रह धरले गेले तर मात्र उद्योगधंदे उभे राहू शकणार नाहीत आणि महाराष्ट्र ही संधी गमावेल, असंही त्यांनी बजावलंय.

फडणवीस यांनी त्यांच्या अभ्यासूपणाचा प्रत्यय त्यांच्या पाच वर्,च्या कारभारात दिला होताच पण विरोधी पक्षनेता म्हणूनही ते सरकारला जागं करताहेत. वेळ गेल्यानंतर नव्हे तर वेळेवर भानावर आणायचा प्रयत्न करताहेत. मुझे दुष्मन मिला तो सिवाजैसा, हे औरंगजेबाचे वाक्य प्रभाकर पणशीकर हे जुन्या पिढीतले अभिनेते फार ताकदीनं सादर करत. फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळं किमान अभ्यासपूर्ण टीका ऐकायला मिळतीय आणि सावध ऐका पुढल्या हाका, हे लक्षात ठेवलं तर लोकप्रिय मुख्यमंत्री यांची संभाव्य काटेरी वाट बिनकाट्याची होऊ शकते आणि त्यातून राज्याचंही भलं होऊ शकेल, अशी आशा करायला हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER