समृद्धी महामार्ग समुद्रात बुडवणार?

शिवसेनेचे सरकार आले तर देवेंद्र सरकारने हाती घेतलेले अनेक वादग्रस्त विकास प्रकल्प थंडबस्त्यात टाकले जातील अशी मुंबईच्या अधिकारी वर्तुळात चर्चा आहे. समृद्धी महामार्ग ह्या नावाने ओळखला जाणारा मुंबई-नागपूर महामार्ग शिवसेनेच्या हिट लिस्टवर पहिल्या क्रमांकावर आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा प्रकल्प तब्बल ५० हजार कोटी रुपये खर्चाचा आहे. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही समृद्धीसाठी जमिनीचे ९० टक्के संपादन झाले आहे.

जमिनी ताब्यात घेण्याचे सुरू असताना खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे झाले होते. दोन्ही काँग्रेसनेही समृद्धीला विरोध केला आहे.

नाणार प्रकल्प देवेंद्र सरकारला रद्द करायला लावून शिवसेनेने कोकणात मोठी मुसंडी मारली. त्याच धर्तीवर समृद्धी महामार्ग बुडवून शिवसेना शेतकरी लाटेवर स्वार होऊ इच्छिते अशी चर्चा रंगते आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी मोबदल्याचे पैसे उचलले आहेत त्याचे काय? असा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे समृद्धीला थंडबस्त्यात टाकले जाण्याचीच मोठी शक्यता आहे.समृद्धी महामार्गच नव्हे तर पायाभूत सुविधांचे अनेक वादग्रस्त प्रकल्प नव्या सरकारच्या कोपाला बळी पडू शकतात. अनेक प्रकल्प रखडण्याची भीती आहे. मुंबई मेट्रो रेल्वे-३ च्या कार शेडसाठी आरे कॉलनीमध्ये जागा देण्याला शिवसेनेचा कडाडून विरोध आहे. तरीही देवेंद्र सरकारने तिथली झाडे कापून तो प्रकल्प रेटला. आता कार शेडची जागा बदलली जाईल.

केव्हा बनणार सरकार?

नव्या सरकारमुळे केवळ राजकारणच बदलेल असे नाही. प्रशासनातही मोठी उलथापालथ होणार आहे. अनेक वादग्रस्त अधिकारी बदलले जाईल. प्रवीण परदेशी, अश्विनी भिडे आणि अश्विनी जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे लाडके अधिकारी तातडीने दुसरीकडे हलवले जातील. सध्या मंत्रालयात हाच चर्चेचा विषय आहे.