विदर्भातील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या, फडणवीस यांची शासनाकडे मागणी

NDRF - Devendra Fadnavis

मुंबई : सतत दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भ विशेषत: पूर्व विदर्भातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या भागात तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मध्यप्रदेश सरकारशी (Madhya Pradesh Government) योग्य समन्वय न राखल्याने ही पूर परिस्थिती निर्माण झाली. राजीवसागरचे पाणी सोडल्यानंतर ते ३६ तासांनी महाराष्ट्रात पोहोचते. वेळीच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असता तर नुकसान टाळता आले असते. पण, तसे न केल्याने नदीकिनारी राहणार्‍या घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात सुमारे ५ हजार कुटुंब बाधित असून, चंद्रपुरात १३ गावे बाधित आहेत. गोंदियात ४० गावे बाधित झाली आहेत.

गडचिरोलीत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आता तरी मदतीसंदर्भात राज्य सरकारने त्वरित पुढाकार घेतला पाहिजे. एनडीआरएफची (NDRF) मदत वेळीच घेता आली असती, पण त्यालाही विलंब लागला. आता राज्य सरकारने त्वरित पंचनामे करून पूरग्रस्तांना वेळीच मदत करावी. मदतीसंदर्भात कोल्हापूरच्या पुराच्या धर्तीवर स्वतंत्र अध्यादेश काढून या भागातील नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER