४० हजार कोटी परत केल्याचा दावा फडणवीसांनी फेटाळला

Devendra Fadnavis

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला, असा गौप्यस्फोट भाजप नेते अनंत हेगडे यांनी केला आहे. हा निधी परत करण्यासाठीच ८० तासांचा मुख्यमंत्री व्हायचा ड्रामा करण्यात आल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

‘८० तास मुख्यमंत्री असताना शेतकरी मदतीचा ५ हजार कोटी रुपयांच्या निर्णयाव्यतिरिक्त कोणताही निर्णय झाला नाही. व्हॉट्सऍप फॉरवर्ड बातमीवर पुराव्यानिशी बोलणं केव्हाही योग्य. झालेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. “केंद्राला एक नवा पैसाही परत पाठवलेला नाही, केंद्राकडून पैसा आलाच नाही, शिवाय काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही”, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

“४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री झाले”; अनंत हेडगे यांचा दावा

“अनंत हेगडे नेमकं काय म्हणाले हे मला अद्यापही माहिती नाही. पण जे काही मीडियातून समजतंय, त्यावरुन मला माहिती मिळाली आहे. अनंत हेगडेंचा दावा शंभर टक्के धादांत खोटा आणि चुकीचा आहे. एक नवा पैसादेखील महाराष्ट्राने केंद्र सरकारला परत केलेला नाही. मुळातच बुलेट ट्रेनकरिता एक नवा पैसा केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला मिळालेला नाही. बुलेट ट्रेनसाठी एक कंपनी तयार झालेली आहे. जी केंद्र सरकारची आहे. जेव्हा केव्हा बुलेट ट्रेनचे पैसे येतील, तेव्हा ते पैसे या कंपनीमध्ये येतील, महाराष्ट्र सरकारकडे येणार नाही. महाराष्ट्र सरकारची भूमिका ही केवळ जमीन हस्तांतरणाची आहे.

ज्यांना अकाऊंटिंगची पद्धत समजते, त्यांना असे पैसे आले, आणि परत पाठववले असं कधी होत नाही हे कळतं. तसंही मी जेव्हा काळजीवाहू मुख्यमंत्री होतो, किंवा मुख्यमंत्री होतो, निवडणुकीनंतर किंवा त्याकाळात एकही धोरणात्मक निर्णय मी घेतलेला नाही. जोपर्यंत नियमित सरकार येणार नाही, तोपर्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार नाहीत, हे मी जाणीवपूर्वक सांगितलं होतं. त्यामुळे धादांत खोटं, चुकीचं पसरवण्यात येत आहे. मी पुन्हा स्पष्टपणे सांगतो की एक नवा पैसादेखील महाराष्ट्राचा केंद्राला गेला नाही, केंद्राने तो मागितलेला नाही. मागण्याचा विषय येत नाही, देण्याचा विषय येत नाही”. असेही फडणवीस म्हणाले.