सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या ‘शिदोरी’वर बंदी घालण्याची हिंमत आहे का? फडणवीसांचे आदित्यला आव्हान

Devendra Fadnavis-Aditya Thackeray

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यातील बांगड्यांचा वाद चांगलाच चिघळला आहे. ‘बांगड्या घालण्याचं वक्तव्य कोणाला आवडणार नाही. त्यामुळे मी गप्प बसणार का, असा प्रश्न विचारला होता. परंतु आदित्य ठाकरेजी, सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या ‘शिदोरी’ अंकावर बंदी घालण्याची हिंमत तुमच्या सरकारमध्ये आहे का?’ असा थेट सवाल फडणवीसांनी शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरेंना विचारला.

‘मी आधीच बोललो होतो, की बांगड्या घालण्याचं वक्तव्य कोणाला पचणार नाही. त्यामुळे मी गप्प बसणार का, असं म्हटलं. परंतु त्यांनी माझं संपूर्ण भाषण शांतपणे ऐकलं असतं, तर असं वक्तव्य केलंच नसतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होईल, याची कल्पना त्यांना होती.  त्यामुळे या वादाला बगल देण्यासाठी त्यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला. पण आदित्य ठाकरेजी, सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या ‘शिदोरी’ मासिकावर बंदी घालण्याची हिंमत तुमच्या सरकारमध्ये आहे का? आधी हे सांगा, मग बाकीच्या गोष्टी बोलू. ’ असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना दिलं.

दरम्यान, आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वा. सावरकर यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असताना ‘शरीर स्वतःचं पण मेंदूवर दुसऱ्या कोणाचा कंट्रोल आहे’ असा घणाघात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी शिवसेनेवर केला आहे. तर स्वा. सावरकर यांच्या मुद्द्यावरून शिवसेना शांत कशी, असा सवालदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.