सभेत फडणवीसही भिजले आणि जयंत पाटीलही, मात्र फायदा भगीरथ भालकेंचा

Devendra fadnavis - Jayant Patil - Baghirat Bhalke - Maharastra Today
Devendra fadnavis - Jayant Patil - Baghirat Bhalke - Maharastra Today

मंगळेवढा : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीत खरी लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी असणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, दोन्ही पक्षातील नेत्यांनी संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पावसातील सभेचं अनुकरण करत मतदारांना भावनिक साद घातली. तर दुसरीकडे काल भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भिजण्याने कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके हे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यावर भारी पडतील अशी चर्चा सध्या सुरू आहे.

निमित्ताने भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सभा घेतली. मंगळवेढा तालुक्यातील सलगर बु. येथे झालेल्या सभेत जोरदार पाऊस झाला. या पावसातही पाटील यांनी आपले भाषण जोरदार पद्धतीने केले. जयंत पाटील यांनी पावसात भिजत भाषण पूर्ण केले. नेतेमंडळी पावसात भिजले की उमेदवार निवडून येतो, असे समीकरण आहे. त्यामुळे जयंत पाटील भिजल्याचा फायदा भालके यांना होणार का, याची उत्सुकता आहे.

राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी साताऱ्यात शरद पवार यांच्या झालेल्या सभेत पाऊस पडला. या भर पावसात पवार यांनी केलेले भाषण राज्यात गाजले. त्यामुळे छत्रपती उदयनराजे यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराचा पराभव झाला. त्याची आठवण या निमित्ताने सभेत निघाली.

आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात पाटील यांनी टोलेबाजी केली. सत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागलं आहे. पाण्याविना मासा तडफडतो तशी भाजपची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करून भगीरथ भालके यांना विजयी करा. भारत नानांचा हा मुलगा, पवार साहेबांच्या आशीर्वादाने या मतदारसंघासाठी आधुनिक भगीरथ ठरेल, असा विश्वास त्यांनी केला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचेे महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याचा दावा त्यांनी यानिमित्ताने केला.

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या सभेतही पावसाने हजेरी लावली. यावेळी मात्र फडणवीस यांनी भावनिक साद न घालता थेट महाविकास आघाडीतील नेत्यांना आव्हानच देऊन टाकले. शरद पवारांच्या सभेचा उल्लेख करत आपल्याला आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही असं म्हणत, या निवडणुकीमध्ये तुम्ही यांचा कार्यक्रम करा मी राज्यामध्ये यांचा कार्यक्रम करतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे पावसाच्या या सभेचा नेमका कोणाला होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button