‘मी आणि फडणवीस फिरलो, उद्धव ठाकरेंनीही पीपीई किट घालून बाहेर पडायला हवं होतं’

Uddhav Thackeray - Devendra Fadnavis - Chandrakant Patil - Maharashtra Today

पुणे : कोरोनाच्या संपूर्ण संकटसमयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केल्याचं दिसलं नाही. आम्ही कोरोनाच्या काळात सतत राज्यभर फिरत आहोत. आमच्या दोघांइतकं कोणताच नेता फिरला नसेल. खार तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आधीच पीपीई किट घालून बाहेर पडायला हवं होतं, अशी मिस्कील टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीआज माध्यमांशी बोलताना केली.

पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी लसीकरणाचे ग्लोबल टेंडर, मराठा आरक्षण आणि राज्यातील कोरोना परिस्थिती अशा विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारने परदेशी लसींना अद्यापही परवानगी न दिल्याने महाराष्ट्र सरकारची लस खरेदी रखडल्याचे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितलं. पण मुळात लसींना परवानगी नसताना त्यांनी ग्लोबल टेंडर हा शब्द वापरलाच कसा?, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच मुंबई महानगरपालिकेप्रमाणे पुणे पालिकेला ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून लस खरेदीसाठी परवानगी दिली जात नसल्याच्या भाजप नेत्यांच्या आरोपात तथ्य असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

तसेच मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी भाजप काही लोकांना फूस देत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. नागपुरातील काही मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांना भाजप रसद पुरवत असल्याचा आरोप काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी केला होता. मात्र, सचिन सावंत यांनी प्रथम त्याचे पुरावे सादर करावेत, आणि नंतर आरोप करावे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली होती. या भेटीविषयी विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे इतक्या प्रो-अ‍ॅक्टिवली घराबाहेर पडले, ही कौतुकाची बाब आहे. खरंतर त्यांनी यापूर्वीच पीपीई किट घालून बाहेर पडायला हवं होतं, अशी मिस्कील टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button