पदोन्नतीतील आरक्षणाबातब आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका, फडणवीसांचा आरोप

Devendra Fadnavis

भंडारा :- मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्दयावरून आघाडी सरकारमध्येच वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस (Congress) विरुद्ध शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) असा सामना आता बघायला मिळत आहे. पदोन्नतीतील आरक्षणाबाबतचा तो जीआर रद्द करण्यास भाग पाडू असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ताधाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे. आघाडी सरकारचा सामाजिक न्याय केवळ बोलण्यापुरताच आहे. पदोन्नतीतील आरक्षणाबातब आघाडी सरकारची भूमिका दुटप्पी असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस आज भंडारा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी भंडारा जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पुढे फडणवीस म्हणाले, पदोन्नतीतील आरक्षणाबातब आघाडी सरकारने दुटप्पी भूमिका घेतली आहे. याबाबत एकानं वेगळी भूमिका घ्यायची आणि दुसऱ्याने आणखी वेगळं काही सांगायचे हे त्यांचं ठरलं आहे. यांचा सामाजिक न्याय बोलण्यापुरता आहे. त्यांचा बोलण्याचा सामाजिक न्याय वेगळा आहे आणि कृतीतील सामाजिक न्याय वेगळा आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

यावेळी त्यांनी भंडाऱ्यातील कोरोना परिस्थितीवर समाधाना व्यक्त केलं. दुसऱ्या लाटेत भंडाऱ्यातील स्थिती अत्यंत चिंताजनक होती. आता भंडाऱ्यातील रुग्ण संख्येत कमालीची घट झाली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहे. खासदार या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.

भंडाऱ्यात म्युकर मायकोसिसचे (Mucormycosis) काही रुग्ण आढळून आले आहेत. पण या रुग्णांचे ऑपरेशन करण्याची सुविधा भंडाऱ्यात उपलब्ध नाही. त्यासाठी रुग्णाना नागपूरला (Nagpur) न्यावे लागते. मात्र, म्युकर मायकोसिसच्या रुग्णाचे लवकर निदान होऊन त्याच्यावर तात्काळ उपचार केले तर परिस्थिती नियंत्रणात येईल, तशा सूचनाच मी प्रशासनाला दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

या रुग्णालयात दहा बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही महिने उलटून गेले आहेत. मात्र अजूनही रुग्णालयात फायर सेफ्टी यंत्रणा बसविण्यात आली नाही. आता टेंडर निघाल्याची माहिती देण्यात आली आहे. पण त्याबाबतची अधिक माहिती मिळाली नाही. एवढी मोठी दुर्घटना होऊनही फायर सेफ्टी यंत्रणा न बसविणे हा निष्काळजीपणा आहे, असं ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button