जामीन मिळताच फडणवीस म्हणाले, ‘यामागे कोण आहे हे मला माहीत आहे, योग्य वेळी बोलेन!’

Devendra Fadnavis

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा त्यांच्यावर आरोप होता. फडणवीस हे आज न्यायालयात उपस्थित झाले.

१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. यानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली- “सार्वजनिक जीवनात लोकांसाठी संघर्ष करताना निर्माण झालेल्या केसेस आहेत. यामागे कोण आहे, हे मला माहीत आहे, योग्य वेळी बाहेर येईल, त्यानंतर मी बोलेन.” दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने फडणवीसांना स्थानिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार फडणवीस आज हजर झाले. त्यासाठी ते काल रात्रीच नागपुरात पोहचले होते.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
‘१९१९३ ते ९८ दरम्यान आम्ही झोपडपट्टी काढण्याच्या कारवाईविरोधात आंदोलन केलं होतं. त्यावेळी माझ्याविरोधात दोन खासगी तक्रारी झाल्या. त्या संपल्या असल्यानं प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या नव्हत्या. माझ्यावरील केसेस आंदोलनाच्या आहेत.

त्या लपवण्याचं कुठलंही कारण नव्हतं. वकिलांच्या निर्णयानुसार मी प्रतिज्ञापत्र भरलं. कलम १२५ प्रमाणे निवडणूक जिंकण्यासाठी लपवण्यासारख्या त्या केसेस नव्हत्या. मी दोन्ही वेळा ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी जिंकलो आहे. न्यायालयानं या प्रकरणात मला जामीन देऊन पुढची तारीख दिलेली आहे.’ असं फडणवीस म्हणाले. या सगळ्यामागे कोणाचा हात आहे याची मला कल्पना आहे. त्यावर योग्य वेळी बोलेन. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर