
मुंबई : मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या मेट्रोच्या (metro) प्रश्नावर सरकारचे अक्षम्य असे दुर्लक्ष होते आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. मेट्रो-३ च्या कारशेडची (Metro-3 carshed) जागा बदलण्याचा घातलेला घाट, आधीच अहवाल लिहून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स, राज्याचे आर्थिक आणि मुंबईकरांचे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आरे येथेच कारशेड करण्याबाबत तत्काळ पावले उचलण्याची गरज व इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवले आहे.
फडणवीस म्हणालेत, मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आरेचीच जागा योग्य असताना कांजूरमार्गच्या जागेचा आग्रह धरला जातो आहे. आता तर काही प्रशासकीय अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यातून राज्याचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे; शिवाय, मुंबईकरांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असलेला मेट्रो प्रकल्प लांबणीवर पडणार आहे. मेट्रोचे कारशेड आरेत करायचे नाही, असा अहवाल आधीच तयार ठेवून नवीन कमिटीचा फार्स करण्यात येतो आहे. असे भासविण्याचा प्रयत्न आहे की, आरे कारशेडची जागा २०३१ पर्यंतच पर्याप्त आहे.
मेट्रो-3च्या कारशेडची जागा बदलण्याचा घातलेला घाट, आधीच अहवाल लिहून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स, राज्याचे आर्थिक आणि मुंबईकरांचे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आरे येथेच कारशेड करण्याबाबत तत्काळ पाऊले उचलण्याची गरज याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र..#MumbaiMetro pic.twitter.com/CygnVSq3XJ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 21, 2021
त्यानंतर नवीन जागा शोधावी लागेल, हे धादांत खोटे आहे. आरे कारशेडसंदर्भात आधीच जागा स्थानांतरणाचा अहवाल तयार केला आणि नंतर समिती तसेच कन्सलटंटचा फार्स सुरू आहे. कारडेपो स्थानांतरित केल्यामुळे हजारो कोटी रुपयांचे होणारे नुकसान असेल किंवा खासगी व्यक्तींना हजारो कोटींचा फायदा असेल, हे सर्व सत्य उघडकीस येईलच. त्यावेळी विनाकारण आपल्यावरही संगनमताचा आरोप होईल, हे टाळण्यासाठी व मुंबईकरांच्या हितासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि तत्काळ आरे येथे कारडेपोचे काम सुरू करावे, अशी विनंती फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केली आहे.
मेट्रो कारशेडसाठी महिनाभरात पर्यायी जागा शोधा!
सुमारे २३ हजार कोटी रुपये खर्चाच्या वादग्रस्त कुलाबा- वांद्रे- सिप्झ मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आता तिसरी समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील नऊ सदस्यीय समितीवर एक महिन्यात कारशेडसाठी नवीन जागा शोधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कारशेडसाठी कांजूरमार्ग, आरे की अन्य कोणती जागा अधिक योग्य आहे, याचाही निवाडा देण्याची जबाबदारीही या समितीवर आहे.
मेट्रो-३चे आरेमधील कारशेड कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषित केला होता. त्यानुसार उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी कांजूरमार्ग येथील १०२ एकर जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) दिली. एमएमआरडीएने या जागेवर भराव टाकून कारशेड उभारण्याचे काम सुरू केले होते. मात्र केंद्र सरकारने मिठागर आयुक्तांकडून या जागेवर दावा सांगत न्यायालयात धाव घेतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला