काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू, हा शब्द बाळासाहेबांना दिला होता का? – फडणवीस

नागपूर :- काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू, हा शब्द बाळासाहेबांना शिवसेनेने दिला होता का? असा प्रश्न विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. राज्यात सर्वात जास्त ठिकाणी भाजपाचा विजय झाला. १९९० नंतर भाजपाला दोनवेळा १०० पेक्षा जागा मिळाल्या. मात्र हे सरकार हाराकिरीचं सरकार आहे असाही टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. नागपूर अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. या चर्चेत देवेंद्र फडणवीस यांनी ‘सामना’मधले पवारांबाबतचे उल्लेख वाचून दाखवले. ज्यामुळे गदारोळ झाला.

मी सामना वाचत नव्हतो; पण आता सबस्क्रिप्शन लावलं. पवारांबाबत काय काय बोललं गेलं, उद्धव ठाकरेंबाबत काय काय बोललं गेलं, हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक आहे, असं म्हणताच गदारोळ झाला. त्याआधी विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच टोले लगावले. ज्यावरून शिवसेनेचे आमदार, मंत्री हे चांगलेच चिडले. माझा वेळ हेच लोक खात आहेत माझ्या आरोपांना उत्तर देऊन, असाही टोला फडणवीस यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, आमच्यापुढे सगळे पर्याय खुले आहेत. त्याचा सोयीस्कर विसर शिवसेनेला पडला आहे.

‘खुर्चीवर बसल्यानंतर संयम ठेवावा’; फडणवीसांचा विधानसभा अध्यक्षांना सल्ला

२५ हजार हेक्टरी मदत कोरडवाहू शेतीला आणि ५० हजार रुपये हेक्टर बागायती शेतीला देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. अल्प भूधारक शेतकऱ्यांना हे आश्वासन देण्यात आलं होतं. अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन देण्यात आलं होतं त्याचं काय झालं? तुम्ही दिलेला शब्द तुम्हीच पाळला नाही. तुम्ही केंद्र सरकारला मदत मागितली होती; पण घोषणा केंद्र सरकारच्या जीवावर केली होती का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला विचारला.