‘आमचे अजितदादा तर त्याहूनही वर निघाले’, भर सभेत फडणवीस संतापले

fadanvis-on-ajit-pawar-farm-laws

पुणे :- मोदी सरकारच्या (Modi Govt) कृषि कायद्याविरोधात दिल्ली येथे गेल्या महिन्याभरापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर कृषी कायद्याचे महत्व पटवून देण्यासाठी आज भाजपचे राज्यभर शेतकरी संवाद अभियान सुरु आहे. पुण्यातील के. के. घुले विद्यालयाच्या मैदानात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सभेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर तोंडसुख घेतलं.

सरकारमध्ये शेतकऱ्यासंदर्भात आवाज उठवणारा कोणी नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार कऱणारं कोणी नाही. पाच वर्ष सातत्याने आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय़ घेतले. अतिवृष्टी, दुष्काळ, पीक रोग प्रत्येकासाठी आम्ही पैसा दिला. शेतकऱ्यावर जेव्हा कधी संकट आलं तेव्हा आम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. पण आज सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकून पहायला तयार नाही. शेतकऱ्याचा साधा विचारही केला जात नाही, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.

ही बातमी पण वाचा : राजा ‘उधार’ झाला अन् हाती भोपाळ दिला; शेतकरी प्रश्नावरून फडणवीसांचे  मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र   

ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या घोषणा करत शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते. तिथे जाऊन शेतकऱ्याचं नुकसान होतंय आणि कमी पैसे देताय असं सांगत ५० हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे असं जाहीर केलं. कोरडवाहू आहेत त्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत द्यायचं सांगितलं. आमचे अजितदादा तर त्याहूनही वर निघाले. म्हणाले उद्धव ठाकरे तुम्ही ५० हजार म्हणता…बागायतदारांना दीड लाख रुपये मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्याचे कैवारी असल्याचं आम्हाला वाटलं. पण कसले दीड लाख आणि ५० हजार रुपये….राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला अशी परिस्थिती आहे.

आमच्या शेतकऱ्यांना सहा आणि आठ हजार रुपये घोषित केले आणि तेदेखील पोहोचले नाही. शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे, असा संताप फडणवीसांनी व्यक्त केला.

आपल्याला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतात….आमच्या कर्जमाफीच्या नावावर नावं ठेवत यांनी घोषणा केली. आमची कर्जमाफीची योजना संपलीच नव्हती. आम्ही निवडणूक झाल्यावर पुन्हा सुरु करु असं सांगितलं होतं. मात्र या सरकारने आमच्या योजनेचे निकष बदलवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. आमच्या योजनेमध्ये ४२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला. यांच्या योजनेत फक्त २९ लाख शेतकऱ्यांना झाला. आज शेतकऱ्यांसाठी एकही योजना नाही, अशी टीका यावेळी त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER