एक ‘नारद’ बाकी ‘गारद’- देवेंद्र फडणवीस

नाशिक :- संजय राऊत यांनी मुलाखतीचं टायटल ‘एक शरद बाकी गारद’ ऐवजी ‘एक नारद बाकी गारद’ असं ठेवायला हवं होतं- असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्या पवारांच्या मुलाखतीवरून लगावला आहे. तसेच, ‘बाकी सर्व गारद असतील, तर उद्धव ठाकरेही गारद आहेत का?’ असा बोचरा सवाल फडणवीसांनी विचारला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली.  त्या मुलाखतीला ‘एक शरद बाकी सगळे गारद’ असे टायटल दिले. त्यावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

ही बातमी पण वाचा : एक शरद… सगळे गारद! ; संजय राऊतांनी  केला मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध  

कालच्या ‘सामना’तून फडणवीस यांच्यावर बाण सोडण्यात आल्यानंतर फडणवीस-राऊत सामना रंगला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या नाशिक दौ-यावर आहेत. यावेळी टीव्ही-९ सोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, ‘सामना’ किती जण वाचतात? माध्यमांना आयती बातमी मिळते, म्हणून ‘सामना’ला तुम्ही प्रसिद्धी देता. ‘सामना’मध्ये कोरोनाबाबत एकही अग्रलेख नाही.’ अशी टीकाही त्यांनी केली.

‘सामना’ हे शिवसेनेचे नाही, तर तीन पक्षांचे मुखपत्र. अशीही टीका फडणवीसांनी केली. दरम्यान, “राज्यात मास टेस्टिंग महत्त्वाचे  आहे. सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्याऐवजी नंबर गेम खेळण्यात व्यस्त आहे. आकडे कमी दाखवण्यासाठी मुंबईकरांना सरकार अडचणीत आणत आहे. ” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सरकारने अग्रेसिव्ह टेस्ट मोफत करणं गरजेचं आहे.  मुंबईचा इन्फेक्शन रेशो देशात सर्वाधिक आहे. खाजगी हॉस्पिटल सरकारच्या जीआरचा गैरफायदा घेत लूट करत आहेत, असा दावा त्यांनी केला. खाजगी शाळांनी फी वाढवणे चुकीचे आहे. सध्या तरी ऑनलाईन शिक्षण देऊ शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

तसेच, बदल्यांचे आणि फोडाफोडीचे राजकारण करण्याऐवजी कोरोनावर लक्ष द्या, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER