बदलांना सामोरे जाताना…

SWOT

हाय फ्रेंड्स ! बदलांना सामोरे जायचं की नाही ? प्रत्येक जणाला हे आयुष्यात ठरवावं लागतं. काही बदल जीवनाच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे जाताना घडत असतात . या प्रवाहाबरोबर जाताना आपण त्या बरोबरीने गेलो नाही तर त्याचा त्रास आपल्याला व आपल्या सभोवतालच्या लोकांना होत राहतो. तर काही बदल विचारी व्यक्ती ह्या स्वतःच्या विकासासाठी ,प्रगतीसाठी म्हणून योग्य त्या ठिकाणी करीत राहतात.

मात्र काही लोकांचे म्हणणे असते, मी असा किंवा मी अशी आहे. बघा जमतंय का? बरेचदा केवळ प्रवाहपतित होणे किंवा केवळ दुसऱ्यांना खूश करण्यासाठीही बरेच लोक बदल स्वीकारताना दिसतात. माझ्या मते, स्वत्व टिकवून, स्वतःमध्ये योग्य आणि आवश्यक ठिकाणी (म्हणजे काळाप्रमाणे आणि चुका टाळण्याच्या ठिकाणी) बदल करायला पाहिजे.

आणि फार बदल न करता अगदी छोट्या गोष्टींमुळे मोठी वडीलधारी मंडळी खूश होत असतील तर मामुली बदल पण करायला हरकत नाही. मात्र माझ्या आयुष्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये बदल करायचा की नाही हे मात्र फक्त तुम्ही आणि तुम्हीच ठरवू शकता. एकदा मला बदलायचे असे ठरवले की काय करायला लागते ? तर साधारण माझ्यातील गुणदोषांची यादी करावी लागते. ज्याला मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये SWOT ऍनॅलिसिस (SWOT Analysis) म्हणतात.

S – strength – म्हणजे माझी शक्तिस्थळे किंवा गुण.
W -weakknesses -म्हणजे माझ्यातील कमतरता किंवा माझे दोष.
O — opportunities– माझ्यासमोरील उपलब्ध संधी.
T — Threats — म्हणजे माझ्या मार्गातील धोके किंवा अडचणी.

या सगळ्या गोष्टींकडे बघताना खूप तटस्थपणे बघावे लागते. कारण बरेचदा आपण त्याकडे कोणत्या नजरेने बघतो किंवा कोणत्या वृत्तीतून बघतो ते महत्त्वाचे असते . बऱ्याच जणांना हा अनुभव बघता यांची यादी करायला दिल्यावर काही जणांना आपले सगळे दोष दिसतात. जे गुण असतात ते तर असायलाच हवे, असेही त्यांना वाटते . त्यामुळे परिस्थिती फारच निराशाजनक होते. अशीच एक मैत्रीण म्हणते की , ” स्पेशल असे गुण काही नाही माझे.” हे सांगतानाच एक जाहिरात आठवते मला कुठल्याशा कॉल्ड क्रीमची. त्यात एक गृहिणी दाखवली आहे. ती मुलाची काळजी घेते. नवऱ्याला हसायला शिकवते. आणि सासूबाईंची सेवा करत त्यांना सोबत करते.

कॉल क्रीम लावून ती मुलाची काळजी घेते . टाचांना क्रीम लावून देऊन ती सासूबाईंची तर ओठांना क्रीम वापरून ती नवर्‍याला हसायला शिकवते. हे सगळं झाल्यावर , “एवढेच करते मी फार काही नाही !” असे म्हणते. मात्र काही जण स्वतःबद्दल एवढे कॉन्फिडन्ट असतात, त्यांचे पाय बरेचदा जमिनीवर नसतात. त्यांना कायम भन्नाट कल्पना सुचतात .पण त्या प्रत्यक्षात येताना कुठेच दिसत नाहीत. मात्र ते स्वतःला प्रत्यक्ष गुणवान समजतात , इतरांपेक्षा वेगळे समजतात. असे लोक आपल्या अपयशाचं खापर मात्र इतरांवर फोडतात. उदाहरणार्थ सागरिका. तिला असं वाटतं आपल्यात खूप जास्त गुण आहेत. खूप काही तरी तिला करायचं आहे. पण खूप काही तरी याची स्पष्ट कल्पना नाही . आणि दुसरी गोष्ट अंगात प्रचंड आळशीपणा. त्यामुळे त्यासाठी लागणारी जिद्द ,सातत्य ,कष्टाची तयारी नाही .

मात्र हे सगळं का होत नाही याचे खापर ती सतत नवऱ्याच्या डोक्यावर फोडते. दररोजच्या घरातल्या कामांमध्ये तिचे मन रमत नाही. “मी अशा कामांसाठी बनलेली नाहीये!” दररोज तेच ते स्वयंपाक-पाणी रुटीन मला जमत नाही आणि आवडत नाही, असं ती म्हणते. अशा लोकांची आणखीन एक अडचण म्हणजे त्यांना आभाळाखालच्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असतं. इंटरनेटवरून वाचलेली माहिती ते फाडफाड तोंडावर टाकतात. मात्र स्वतःच्या मर्यादांचा विचार न करता फाजील आत्मविश्वास दाखवणे हा बदलामधला सगळ्यात मोठा अडथळा असतो. हा फाजील ,अवास्तव आत्मविश्वास बाळगणारी माणसे अहंकारी आणि तत्काळ निर्णय घेणारी असतात .

समाजाची मूल्ये पाळणे हे त्यांना फारसे महत्त्वाचे वाटत नाही. खरं तर अशा वेळी आपल्या नियंत्रणातील घटक कोणते ? आणि आपल्या नियंत्रणाबाहेरचे घटक कोणते ? हे लक्षात घेणे आणि जे आपल्या नियंत्रणाखाली आहे , त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. पण ते त्यांना जमत नाही. याही माणसांमध्ये बदल होऊ शकतो . त्यासाठी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या नियंत्रणाबाहेर ज्या गोष्टी आहेत , त्यांच्यावर मात करायचा प्रयत्न सोडून द्यायचा. आणि आपल्याला कुंपण कुठे आहे ते पक्के निश्चित करायचे. उदाहरणार्थ, सुनील गावस्कर त्यांना गोलंदाज नेहमी उसळते चेंडू टाकायचे आणि तेही हूक मारायचे. त्यासाठी ते प्रसिद्ध होते. पण त्या प्रयत्नांमध्ये ते विकेट गमावू लागले. शेवटी त्यांनी ठरवलं की उसळता चेंडू आला तर खाली वाकायचं पण हूक मारायचं नाही.

आणि मग सगळ्यात शेवटच्या कसोटीत त्यांनी आपला खास हूकचा फटका काढून कसोटीत यशस्वीपणे वापरला. म्हणजे आपले सामर्थ्य कधी आपली मर्यादा बनतं तर कधी आपली मर्यादा हीच आपलं सामर्थ्य पण बनतं. म्हणूनच योग्य त्या ठिकाणी योग्य त्या गोष्टींचा वापर करणे आवश्यक होते. संधींच्या बाबतीत बोलायचं तर ,संधी नेहमीच आपलं दार ठोठावत असतात. पण बरेचदा आपल्याला त्याचा आवाज ऐकू येत नाही. म्हणूनच कायम आपलं लक्ष त्यावर असू द्यावं लागतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाताला आलेली संधी कधीही सोडायची नसते. जाऊ दे पुन्हा येईल तेव्हा बघू ! असंच धोरण ठेवलं तर संधी मिळेनाशा होतात. जरा जम बसल्यावर किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये एक उंची गाठल्यानंतर आपण एखादी संधी घालवू शकतो. पण तोपर्यंत कोणतीही किंमत द्यावी लागली, म्हणजे आपली तब्येत, मेहनत, वेळ या सगळ्यांशी तडजोड करून प्रत्येक संधी पकडायला लागते. म्हणतात ना, थांबला तो संपला !

कोणत्याही क्षेत्रात एखादं काम तुम्ही कराल का ? असं विचारल्यावर त्याला उत्तर हो असंच यायला पाहिजे. नंतर बघून घेता येतं कसं करायचं ते ! आणि तेवढी निष्ठा पाहिजे की त्यासाठी मला जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी करणार आहे. दिवस-रात्र एक करायला लागलो तरी मी ती करणार ! अडचणींबाबत बोलायचं तर आपला सेल्फ टॉक ! आपण सतत स्वतः काही तरी विचार करत असतो, बोलत असतो मनातल्या मनात ! ते जर वारंवार एकाच प्रकारचे असेल, तर पुढे ती वाक्ये आपल्या स्वभावाचा भाग बनून जातात आणि त्यानुसारच मग आपले वर्तन आणि भावना होतात. म्हणूनच हा इतका सकारात्मक होईल तितका तो योग्य होतो. मात्र नकारात्मक सेल्फ टॉक हा आपल्यासमोरील अडथळा ठरू शकतो.

दुसरी गोष्ट आपण आपली इतरांसोबत करत असलेली तुलना. त्यामुळे आपण स्वतःला फार मोठे समजतो आहोत, असा विचार करायला हवा. कधी सहकाऱ्यांशी तर कधी मित्रांशी, कधी नात्यातल्या लोकांशी तुलना करून आपण आपली किंमत ठरवत असतो. खरं तर एवढे मोठे आपण नसतो. म्हणूनच बदलांना सामोरे जाताना आपले गुण ,दोष आपल्यासमोरील संधी आणि वाटेतील अडथळे यांचा संपूर्ण विचार करून योग्य तो बदल करावा.


मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER