बदलांना सामोरे जाताना !

Changes In Life - Maharashtra Today

शेजारची सुलेखा ,त्यांचा स्वतःचा व्यवसाय .त्यामुळे सगळ्या व्यावसायिकांप्रमाणेच बदल हा त्यांच्या आयुष्यात कायमच पाय रोवून उभा असायचा. म्हणजे ऑफिसच्या वेळा ,जेवणाच्या वेळा आणि झोपण्याच्या वेळा बहुतेक वेळा घड्याळाशी फटकून वागायच्या. अगदी गावाला जाण्याचे प्लॅन देखील वेळेवर ठरायचे. आणि त्यात पटदिशी ती तयारी करून तयार व्हायची .गंमत म्हणजे बरेचदा सुरुवातीला तिला आणि मुलांना गाडीत घालून नवरा निघायचा आणि विचारायचा, बोला कुणीकडे वळायचं? आणि मग त्या दिशेचा टुरिस्ट स्पॉट निवडला जायचा. अलीकडे मात्र टुरिस्ट स्पॉटवर होणारी गर्दी, हॉटेल्सना जागा न मिळणे यामुळे आधी बुकिंग वगैरे करायला सुरुवात केली. म्हणजे काय, एकूणच बदल हा त्यांच्या पाचवीला पुजलेला !

आणि तिची शेजारीण संजना. म्हणजे अगदी “ऑफिस टाइम !”सगळच कसं नियोजनबद्ध ,आखीव रेखीव. फ्रेंड्स ! बदल हे असंच प्रकरण आहे बघा ! म्हणजे बरेचदा चेंज हा शब्द आपल्याला खूप हवासा वाटतो .बरेच दिवसांपासून असणाऱ्या रुटीनला आपण कंटाळतो. आणि चेंज म्हणून आपण फिरायला निघतो. दररोज घरच, सात्विक अन्न खाऊन कंटाळा येतो .जरा चमचमीत खावसं वाटतं मग हॉटेलिंग, बाहेर खाणे, एखादा पिक्चर, खरेदी असं करूनच घर येतो .पूर्वी चेंज म्हणून आठ-दहा दिवस तरी आपल्या लोकांना सोडून बायका माहेरी जाऊन राहात.( आजकाल एवढा वेळच नसतो ही गोष्ट वेगळी) एवढेच काय !बरेचदा आपण आपल्या खोलीतल्या फर्निचरची रचना बदलतो. त्यानेही खूप छान वाटत .सुट्टीच्या दिवशी घड्याळालाही सुट्टी देऊन आरामात नातेवाईक मित्रमंडळी कडे जातो किंवा त्यांना बोलावतो.

अहो एवढंच काय आपल्याला बोअर झालेले कपडे आपण उचलून ठेवले, आणि काही महिन्यांनी परत घातले तर आपल्याला ते खूप आवडतात. Yes ! आपण तेवढी फिगर मेंटेन केली तरच ! लहान मुलांना सतत नवीन खेळणी आवडतात. चतुर आई त्यातीलच काही खेळणी उचलून ठेवते आणि काही महिन्यांनी बाळाला परत तेच खेळण देते तेव्हा त्याला किती आनंद होतो म्हणून सांगू !

पण काही असेही महाभाग असतात अगदी शूल्लक बदलही त्यांना मानवत नाही. बदल म्हणून केलेली फर्निचरची री अरेंजमेंट त्यांना एकदम खूपते .एवढेच नाही तर त्यांनी बदलून फेकलेले कपडे किंवा इतर वस्तू जर घडी करून ठेवल्या तर त्या त्यांना सापडत नाही. त्यांची गैरसोय होते आणि चक्क चिडचिड सुद्धा होते. अगदी बऱ्याच जणांकडे डायनिंग टेबलवर जेवायला बसायच्या जागा ठरलेल्या असतात.(आईची जागा अशी असते जिथून ती पटकन उठून राहिलेली वस्तू आणू शकली पाहिजे ) अनेक जणांना झोपेची जागा बदलली, वेळ बदलली तर झोप सुद्धा लागत नाही. थोडक्यात आपण सर्वजण सवयीचे असे बऱ्याच प्रमाणात गुलाम असतो.

बऱ्याच सवयी अशा असतात, किंवा स्वभावाचे काही पैलू असतात की जे बदलणे आवश्यक आहे, असे आपल्याला कळत असते. उदाहरणार्थ, हातातल्या कामाची चाल ढकल करण्याच्या स्वभावामुळे आपले काम वेळेवर पूर्ण होत नाही .किंवा तापट स्वभावामुळे नातेसंबंधांवर परिणाम होतो, खर्चिक वृत्तीमुळे आपण नकोशा वस्तूचा पसारा घरात जमवत असतो. आणि मुख्य म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला पट्तात, त्यांचे महत्त्व ही समजते पण मग अशा गोष्टींमध्ये बदल करणे मात्र खूप कष्टाचे जाते. स्वतःला प्रश्न विचारून त्यातून आपल्या कोणते बदल हवे याचे उत्तर शोधता येते, परंतु सगळे कळूनही गाडी मात्र पुढे सरकतच नाही.

या सगळ्या चुकीच्या सवयी सोडणे कठीण जाते .कारण आपण आपण स्वतः स्वतःसोबत तडजोडी करायला लागतो. उदाहरणार्थ मला दररोज लवकर उठायचं आहे, माझ्या जेवणाच्या वेळा ठराविक ठरवायचे आहेत, सोशल मीडियाचा वापर काही मर्यादित वेळेसाठी करायचा आहे. पण आपणच आपल्या सोबत तडजोडी करतो. आज काय सुट्टीचा दिवस आहे, जरा उशीरा उठू या, किंवा हा आवडता पिक्चर आहे आजच्या दिवस वेळ थोडी वाढवून घेऊ या. आणि असं करत करत ही आपलीच वचन आपण पाळली नाहीत, तर आपण आपल्या वर नाराज होत रहातो.

माझी एक मैत्रीण. रात्री झोपायला खूप उशीर व्हायचा, येणार जाणार असायचे. त्यामुळे वर्षानुवर्षे ठरवून सुद्धा तिला सकाळी लवकर उठणे शक्य व्हायचं नाही, आणि तिच्या मिस्टराना ब्रेकफास्टची सवय . तो लागायचाचं . आपण एवढी साधी गोष्ट करू शकत नाही! तेही ठरवूनही. याचा नंतर तिला बराच वेळ वाईट वाटत राहायचं. कारण तेच होतं. स्वतःलाच काहीतरी ती स्वतःची कारणं दाखवायची. रात्री झोप उशिरा लागली, कधीतरी कुणी म्हणायचं की येते झोप तर झोपावें, कधी नवराच म्हणायचा, काय प्रॉब्लेम ?मी माझा आमलेट पाव बनवून घेऊ शकतो. आणि पडत्या फळाची आज्ञा म्हणून ही झोपायची. मात्र नंतरच नैराश्य तिची पाठ सोडत नव्हतं.

म्हणूनच बदलासाठी तात्पुरत्या आणि क्षणिक आनंदा पलीकडे जाऊन विचार करायला लागतो. हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिने सकाळच्या साखर झोपेतील आनंदाचा त्याग केला, आणि काय म्हणता ! दररोज ठरवून, आदल्यादिवशी प्लॅनिंग करून ती ब्रेकफास्ट तयार करू लागली, एवढेच नाही तर सकाळच्या पहाटेच्या निसर्गाचा आनंद ही तीला घेता यायला लागला. खरेतर किती क्षणिक आनंदाचा तिने त्याग केला होता. फ्रेंड्स , सवय बदलायची तर फक्त एका क्षणाला जिंकावे लागते.

  • स्वतःला सवलत देण्याची वृत्ती असेल तर याचे रूपांतर कंटाळ्यात होण्याला वेळ लागत नाही. म्हणूनच आरामदायी वृत्तीला खतपाणी घालण्याच्या सवयीत बदल करायला लागतो .व्यायाम करण्याच्या बाबतीत सगळ्यांना हा अनुभव येत असतो. यामुळे शरीराला त्रास होत असतो मग त्या साठी, अनेक सबबी शोधून काढल्या जातात.
  • कुठलाही बदल करायचा तर नवीन गोष्टीला सामोरे जावं लागतं. पण प्रत्येक व्यक्तीला आपला कम्फर्ट झोन प्रिय असतो. त्याच्या पलीकडे जायचं तर खूप मुरड घालावी लागते. उदाहरणार्थ की सगळ्या वस्तू नीटनेटक्या जागेवर ठेवायच्या आहेत , तर त्यासाठी प्रत्येक वेळेला उठून त्या नीट ठेवण्याचे कष्ट घ्यावे लागतात.
  • आणखीन एक गोष्ट म्हणजे बदलांकडे बघण्याचा दृष्टिकोन , कुठलाही बदल करताना ती गोष्ट अतिशय तात्काळ झाली पाहिजे, अगदी थोड्याशा प्रयत्नांमध्ये मोठा बदल पटकन दिसायला हवा, इतका तो सोपा हवा, परत छोट्या बदलाची इतरांनी दखल घ्यायला हवी हे त्याचं कौतुक करायला हवं

आणि असं काही होणार नसेल तर कशाला करायचा बदल ! थोडक्यात पहिले पाढे पंचावन्न !

उदाहरणार्थ वजन कमी करायचा आहे. हा सगळ्यांना अतिशय कठीण वाटणारा एक अनुभव. व्यक्तीला त्यासाठी नियमित भरपूर व्यायाम, आहारावर पूर्ण नियंत्रण, गोड न खाणे, यासारख्या गोष्टी सातत्याने आणि बराच काळ कराव्या लागतात. यश पटकन येत नाही. आणि वजनाचा काटा हलत नाही. परंतु निरंतर प्रयत्नाने काही दिवसातच थोडासा बदल दिसतो हे नक्की ! झालेला हा वजनात ला बदल, इतरांना दिसून येण्याएवढा नसतो, मुख्य म्हणजे आणखी एक वैशिष्ट्य असं की, खाली आलेल्या वजन परत वर खाली ,वर खाली असं होत राहत. तेव्हा पेशन्सची परीक्षा असते.

थोडक्यात बदल ही प्रक्रिया आहे, ही सतत पुढेमागे होत राहते आणि असा प्रगतीचा आलेख अनुभवणे, बदलाला सामोरे जाताना आपण चुका करू शकतो, म्हणून त्यासाठी कृती आराखडा आखून त्याला येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन काम करावं लागतं.

फ्रेंड्स ! सध्याच्या कोरोना काळामध्ये या विषाणू सहित नव्या जगात का बदल करायचे ? काय बदल करायचे ?

बदल म्हणलं की आणखीन एक गंमत अशी आहे की ती आपण इतरांमध्ये, बदल परिस्थितीत वातावरणात हवा किंवा त्यांच्यातला हा बदल व्हायला हवा हे आपण सहज स्वीकारतो. परंतु स्वतःमध्ये बदल व्हायला हवा असं जर असेल तर ते प्रचंड कठीण जात. परंतु आताची जी परिस्थिती आहे, किती दिवस महिने वर्ष राहील हे कुणालाच माहीत नाही. म्हणजे जी आपल्याला नको असते ती अनिश्चितता हेच आता आपले जीवन बनले आहे .आता मला जर या न्यू नॉर्मल ला सामोरे जायचं असेल, कारण असं थांबून तरी किती दिवस राहणार ? म्हणून पहिली गोष्ट म्हणजे आपल्या स्वतः मध्ये बदल करून त्या परिस्थितीला सामावून घ्यायचे .परिस्थितीशी झगडा करण्यापेक्षा त्याला स्वीकारणं हितकारक आहे.

म्हणून त्याच्या पुढच्या काळामध्ये मी कसं असायला हवं ? कोणते बदल मला या नवीन आव्हान सोबत जुळवून घ्यायला मदत करतील ?करोना आधी मला माझ्या मधल्या कोणत्या गोष्टी अडचणीचा ठरत होत्या ? व्यक्तिमत्त्वातले कुठले दोष माझ्या प्रगतीत अडथळे आणत होते ? आणि माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये, विचार पद्धतीमध्ये, दृष्टीकोनामध्ये, माझ्या वागण्यात, माझ्या जीवनशैलीमध्ये, माझ्या पद्धतीमध्ये इतक्या अनंत अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला कराव्या लागणाऱ्या बदलाचा मला आढावा घ्यावा लागणार आहे. बदलांना सामोरे जाऊनच आपण या न्यू नॉर्मलला आपलंसं करून टाकू. आणि तसंही बघा मंडळी, चेहऱ्याला मास्क लावायला लागून आता दीड वर्ष गेलं, आता तो आपल्या अंगवळणी पडत चालला आहे. फक्त असे बदल आपण किती लवकर स्वीकारतो हीच आपली कसोटी आहे. म्हणून बदलांना स्वीकारू या! कारण शो मस्ट गो ऑन !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button