डोळ्यांची काळजी – आयुर्वेदाच्या नजरेतून भाग -2

डोळे अत्यंत नाजूक अवयव, ज्ञानेन्द्रीयांपैकी एक. दृष्टीक्षीण होणे अथवा विविध नेत्ररोग होण्याची कारणे आधीच्या लेखात वाचली असतील. नेत्रांना या कारणांपासून रक्षण करणे खूप आवश्यक आहे. आपले डोळे व दृष्टी चांगली राहावी याकरीता नित्य दिनचर्येत सुद्धा काही गोष्टींची खबरदारी घेण्यास सांगितली आहे. बघूया नेत्ररक्षणाकरीता, दृष्टीज्ञान उत्तम राहण्याकरीता आयुर्वेदात काय सांगितले आहे ते –

नित्य दिनचर्येत स्नान कसे करावे याचे वर्णन करतांना विशेषकरून सांगितले की डोक्यावरून गरम पाण्याने स्नान करू नये. त्यामुळे दृष्टी क्षीण होते. थंडीच्या दिवसात सुद्धा कोमट पाण्याने स्नान डोक्यावरून स्नान करावे. खांद्यापासून गरम पाणी घेतल्यास हरकत नाहीं परंतु डोक्यावरून कधीच उष्ण पाणी घेऊ नये. केस, डोळे याकरीता उष्ण पाणी हानीकारक आहे.

  • नस्य – नाकात रोज तेल टाकणे नेत्र, शिर, कर्ण, केस इ. छातीच्या वरच्या भागातील अवयवांच्या स्वास्थ्याकरीता उत्तम सांगितले आहे.
  • शिरोभ्यंग व पादाभ्यंग – रोज डोक्याला व तळपायाला तेलाने मालीश करणे हे नेत्राच्या स्वास्थ्याकरीता फायदेशीर सांगितले आहे.
  • गण्डूष / कवल – तेल किंवा त्रिफळा काढ्याच्या गुळण्या करणे. तेल पाण्यात टाकून भरपूर प्रमाणात तोंडात गाल दुखेस्तोवर धरून ठेवणे. गण्डूष अथवा कवल रोज केल्यास मुखरोग, नेत्ररोग, कण्ठरोग, अरुचि दूर होते.

भोजनानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासून हात डोळ्यांवर ठेवावे. ती ऊब रोज डोळ्यांवर घेतल्यास उत्पन्न झालेले नेत्ररोग दृष्टी क्षीणता यात लाभ मिळतो. थंड पाणी तोंडात भरून रोज सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा दोन्ही डोळ्यांवर पाण्याचे शिपके मारल्यास नेत्ररोग होत नाही.

रोज सकाळी अंजन डोळ्यात लावल्याने डोळ्यांचे स्वास्थ्य टिकून राहते. आयुर्वेदात सांगितलेले अंजन हे केमिकल विरहीत आहे. बाजारात मिळणारे काजल वा पेन्सिलचा केमिकल्स युक्त वापर इथे अपेक्षित नाही. डोळ्यांना कफाचा धूळीचा धूराचा जो त्रास होतो त्यापासून रक्षा करण्याकरीता आठवड्यातून एकदातरी रसाञ्जन ( सुरमा) लावण्यास सांगितले आहे.

शिंक, अश्रू, मल, मूत्र, अधोवायू इ. नैसर्गिक वेगांना अडकविणे अनेक व्याधीना आमंत्रण आहेच शिवाय नेत्ररोगाना देखील. तीव्र प्रकाश, सूक्ष्म वस्तू, बारीक अक्षर ( मोबाईल लॅपटॉप) सतत बघणे टाळावे. मधे मधे थोडा ब्रेक घ्यावा.

नेत्रतर्पण, आश्चोतन या चिकित्सा नेत्ररोगाकरीता सांगितल्या आहेत. त्रिफळा घृत नेत्रस्वास्थ्याकरीता उत्तम लाभदायक आहे. गुलाबजल, आवळारस अति प्रमाणात आंबट तिखट पदार्थ नेत्र स्वारथ्याकरीता अहितकर आहे म्हणून ते टाळावे. योग्य आहार व प्राकृत वेळेत झोप डोळ्यांच्या स्वास्थ्याकरीता आवश्यक आहे. नेत्र रोगाकरीता विविध औषधांनी नेत्रतर्पण आश्चोतनचिकित्सा आयुर्वेदात सांगितले आहे.

आवळा रस, गुलाब जल, दूर्वांचा रस या पित्त तसेच दाह कमी करणाऱ्या वनस्पतींनी भिजलेला पिचू डोळ्यावर ठेवणे नेत्र दाह वेदना थकवा कमी करतात. त्रिफळा जलाने डोळे स्वच्छ करणे. डोळ्यांचे व्यायाम दृष्टी चांगली ठेवण्यास मदतच करतात. डोळ्यांवर कितीतरी गाणी आपण ऐकली असतील, तेज नजरेचा महिमा आपण अनेक डायलॉगमधून ऐकला आहे. या डोळ्यांना जपणे मात्र आपल्या हातात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER