टोकाचे नैराश्य, सुसाईड आणि कलंक

Extreme depression, suicide and stigma

या शतकातील सगळ्यात गंभीर बनत चाललेला नैराश्याचा आजार आणि त्यामुळे घडणाऱ्या आत्महत्या हि सर्वाधिक सार्वजनिक प्राधान्य असलेली सामाजिक समस्या आता मानली जाते .१९४८ यावर्षी विश्व मानसिक स्वास्थ्य संघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. जिचे उद्दिष्ट मानसिक आजाराचा प्रतिबंध त्यांचे योग्य निदान आणि उपचार तसेच समाजामध्ये मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हे आहे. आज कालच्या कालावधीमधील आत्महत्याचे आणि नैराश्याचे आकडे पाहता त्यात केवळ प्रौढच नाही तर मुलं आणि तरुण सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. आज 15 ते 29 वर्षाच्या वयोगटातील मृत्यूचे मोठे कारण आत्महत्या आणि त्यामागे असणारी हिंसा ,परीक्षेतील अपयश ,प्रेमभंग ,लैंगिक शोषण ,सायबर शोषण आणि खऱ्या किंवा आभासी अपयशामुळे आलेली निराशा ही आहेत. आणि त्यामुळेच आत्महत्या थांबवणे हे एक समाजा पुढचे मोठे आवाहन आहे.

आत्महत्या एकच व्यक्ती करत असली तरी ती फक्त तिच्या पुरती मर्यादित न राहता तिच्या नातेवाईकां मधील कुटुंबियांवर ती होणारा दीर्घकालीन कधीही पुसला न जाणारा आघात असतो. म्हणूनच मानसिक स्वास्थ्याच्या क्षेत्रात त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे. परंतु वास्तवात इतर मानसिक आजारा प्रमाणेच आत्महत्या या गोष्टीकडे ही अत्यंत वेगळ्या पद्धतीने बघितले जाते. तिला कलंक मानला गेल्यामुळे त्यावर मोकळेपणाने बोलले जात नाही. वास्तविक पाहता याच्यावर संवाद साधला गेला तर त्यातील जे धोके आहेत त्यांची ओळख प्रत्यक्ष आधी सगळ्यांना होऊ शकते. सुसाईड आयडीएशन याबद्दल संशोधन सांगते की स्वतःच्या मनाने जीव देणाऱ्याच्या मनात कधी ही केवळ एकच कारण नसते आणि आत्महत्या करण्यापूर्वीची शेवटची घटना ही बहुतेक करून त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक घटनांच्या शृंखलेतील शेवटची घटना असू शकते हे समजने खूप महत्त्वाचे आहे की त्या क्षणाला त्या व्यक्तीला हा मार्ग म्हणजे केवळ त्याच्या वेदनांचा अंत करण्यासाठी एक मार्ग असा दिसून येतो. तसेच अशा प्रयत्नातून वाचलेल्यांना जेव्हा त्यांचे अनुभव ऐकले जातात तेव्हा हेच ऐकण्यात येते की त्यांना जगायचं नव्हतं असं नाही पण त्या विशिष्ट प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांच्या समस्येच्या सोडवणुकीसाठी त्यांना दुसरा कुठलाच मार्ग दिसला नाही. हा मार्ग पत्करणे म्हणजे त्यांच्या समस्येचा अंत असा त्यांना तीव्रपणे वाटल्याने त्यांनी तो प्रयत्न केला. परंतु आत्महत्या या शब्दामागे नकारात्मकता, अपयश ,दुःख असल्याने याविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. कारण यामुळे होणारा मृत्यू बहुतेक अकाली मृत्यू असल्याने जो जास्त त्रास देणारा असतो. मुळातच मृत्यूविषयी जनमानसामध्ये अतिशय भीती असतेच म्हणूनच ते शब्द उच्चारणेही टाळले जाते.

त्याविषयी सर्वसामान्य जनमानसामध्ये काही समज ,ज्याला गैरसमज किंवा फक्त ऐकीव कथा ,ज्याला काही पार्श्वभूमी शास्त्रीय नाही असे समज, म्हणता येईल तसे आहेत. बऱ्याच जणांचा असा समज असतो की जी माणसं आत्महत्या करणार असं सांगत असतात ,तर ती प्रत्यक्षात करत नाहीत किंवा गरजेल तो पडेल काय! वगैरे असं सगळ्यांना वाटतं. परंतु या वेळी थोडेसे सावध झालेले बरे ! कारण आत्महत्या करणाऱ्या सहा जणांपैकी कमीत कमी आठ व्यक्तींनी अश्या धोक्याचा इशारा दिलेला असतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोकळेपणाने या विषयावर त्या व्यक्तीशी चर्चा केल्यामुळे ती त्यासाठी डिवचले जाते असं अजिबात नाही .उलट मोकळेपणाने चर्चा केल्यामुळे आत्महत्या प्रवृत्त व्यक्तीलाही आपल्याला समजून घेणारा कुणी आहे, आपण हाक मारली तर कोणीही येऊ शकेल याची कल्पना येऊन तिच्या मनामध्ये आशा निर्माण होऊ शकते. अशा व्यक्ती स्वार्थी आणि भित्र्या असतात असाही एक समज असतो. परंतु अतिरेकी मानसिक वेदनेपासून अगतिक पणाने ,असमर्थता असल्यामुळे, हताश होऊन स्वीकारलेला हा मार्ग असतो. भावनांच्या वेदनांचा अंत करण्यासाठी ,मिळवलेली ही पळवाट असते, मनाने पर्याय म्हणून कोणीही हा स्वीकारत नाही.

आत्महत्येचा प्रयत्न जर एखाद्या व्यक्तीने केला तर इतरांना कायम असं वाटतं की ही प्रवृत्ती त्या व्यक्तीमध्ये कायमस्वरूपी राहील. पण नाही ! अगतिकतेतून निर्माण झालेली मनस्थिती नेहमीकरता असेलच असे नाही. मानसिक स्वास्थ्यशी आत्महत्या हा मुद्दा संबंधित असला तरी त्या व्यक्तीच्या.

समायोजन क्षमतेवर परिणाम झालेला असतो. कार्यक्षमतेवर नाही. म्हणजेच आत्महत्येचा प्रयत्न करून वाचलेली व्यक्ती आनंदी आणि चांगलं आयुष्य जगू शकते. अशा मनस्थितीचा संबंध आर्थिक स्थितीशी असतो असे नाही किंवा मनोरुग्ण व्यक्ती हे पाऊल उचलते असेही नाही. कारण ह्या दिशेने जाणाऱ्या सर्वच व्यक्ती मनोरुग्ण नसतात.

आत्महत्येला प्रवृत्त अशा लोकांमध्ये काही लक्षणे जाणवतात. दीर्घकाळपर्यंत राहणारे दुःख किंवा नैराश्य. कायम विचार करणे, गंभीर रहाणे .अशा व्यक्ती पूर्णपणे एकाकी राहण्याचा प्रयत्न करतात .लोकांना सामोरं जाण्याचं टाळतात. आवडणार्‍या गोष्टींपासून दूर राहतात स्वतःच्या दिसण्याबद्दल निष्काळजी बनतात .अमली पदार्थांचे सेवन करणे, निष्काळजीपणाने गाडी चालवणे उगाच धोका पत्करणे, काही व्यक्ती आवराआवरी ची भाषा करतात ,निरोपाची भाषा वापरतात.

मृत्युपत्र बनवतात मनातले कागदावर उतरवतात वगैरे
अश्या वेळी या गोष्टी गांभीर्याने घ्यायला हव्यात. सगळ्यात महत्त्वाचं अशा लक्षणांत बद्दल जागरूक राहणं .नैराश्याची चिन्हे ओळखणं ,योग्यवेळी हस्तक्षेप करणे. आणि निसंकोचपणे विचारण की सेल्फ हार्म बद्दल काही मनात विचार येत आहेत का? बरेचदा अशा व्यक्तीला एखाद्या प्रेमाच्या हक्काच्या व्यक्तीची गरज असते. कदाचित ती तुमच्या बरोबर शेअर करून त्यातून बाहेर येऊ शकते. एखादी व्यक्ती अशा प्रयत्नातून वाचली तरीही तिची मनस्थिती अतिशय सुन्न झालेली असते तिला मानसिक गोंधळ, प्रचंड स्वतःबद्दलचा राग ,अपराधीपणाची भावना आणि आता पुढे काय असे द्वंद्व सुरू असते. अशा शारीरिक, मानसिक ,भावनिक दुखणी किंवा जखमा भरून यायला वेळ लागतो. अशावेळी समजूतदारपणा आणि घरच्यांचा जोमदार भावनिक आधार गरजेचा असतो. उगीचच रागावून ,दोष देऊन, टीका करून काही होत नाही. आत्महत्याग्रस्त माणसांची कुटुंब हीसुद्धा दुःख, शोक ,धक्का यातून जात असतात. त्यांनाही जवळच्या लोकांच्या सपोर्टची खूप गरज असते. आपण त्या व्यक्ती साठी काही करू शकलो असतो अशी खंत या कुटुंबियांच्या मनामध्ये कायमस्वरूपी असते. त्यावेळी त्यांना भावनिक आधाराची गरज असते. वेळप्रसंगी समुपदेशनही त्यांना उपयोगी पडते. असे प्रसंग आपल्या आजूबाजूला समाजात घडताना दिसले तर एक समाजातील महत्त्वाचा घटक म्हणून आपली जबाबदारी ओळखता यावी, आपल्याकडून काही मदतीचा हात देता येईल तो द्यावा . आणि गरज वाटल्यास समुपदेशकाची मदत घेण्यासाठी मार्गदर्शन करता येईल, गरज ओळखून ते करावे. कारण ही फार मोठी सामाजिक समस्या आहे. यासाठी काही हेल्पलाईनही उपलब्ध आहेत. त्याचाही लाभ घेता येईल.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER