तपासासाठी आरोपीचा संगणक जप्त करून ठेवता येत नाही

पोलिसांच्या अरेरावीस हायकोर्टाचा लगाम

Karnataka High Court

बंगळुरु: एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीच्या संगणकातील डेटाची गरज असेल तेव्हा पोलिसांनी फक्त तेवढा डेटाच काढून घ्यायला हवा. तपासाच्या नावाखाली आरोपीचा संगणक व अन्य इलेट्रॉनिक उपकरणे जप्त करून ठेवता येणार नाहीत, असा निकाल देत कर्नाटक उच्च न्यायालयाने (karnataka-high-cour) पोलिसांच्या अरेरावी आणि मनमानी कारभारास आळा घातला आहे.

‘पॉवर टीव्ही’ (Power TV) या एका स्थानिक वृत्तवाहिनीने मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारी वृत्तमालिका प्रसारित केली. त्यानंतर येदियुरप्पा कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून त्या वृत्तवाहिनीचे मालक व संपादक राकेश शेट्टी यांच्याविरुद्ध धमक्या देऊन खंडणी वसुलीचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला. त्याविरुद्ध शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. त्यात त्यांचे पहिले म्हणणे असे होते की, पोलिसांनी तपासासाठी आपल्याकडे आपल्या यूट्यूब व फेसबूक या समाजमाध्यमातील खात्यांचे  युजरनेम आणि पासवर्ड  विचारले.

आपण ते पोलिसांना दिले. पोलिसांनी ते वापरून त्यांना हवी ती माहिती मिळवली व नंतर युजरनेम व पासवर्ड बदलून टाकले. मात्र हे बदललेले  युजरनेम व पासवर्ड आपल्याला दिले नाहीत. यामुळे आपण समाजमाध्यमांवरील आपली खाती वापरू शकत नाही. पत्रकार म्हणून रोजच्या कामात अशा प्रकारे पोलिसांनी अडथळा निर्माण केला आहे. पोलिसांचे हे वागणे चुकीचे ठरविताना न्या. सुराज गोविंदराज यांनी म्हटले की, समाजमाध्यमांवरील खाती व त्यांचे युजरनेम आणि पासवर्ड त्या संबंधित व्यक्तीच्या स्वत:च्या मालकीचे असतात.

पोलीस ते स्वत:कडे ठेवून घेऊ शकत नाहीत. तपासाचे काम झाले की, या गोष्टी ज्याच्या त्याला परत द्यायला हव्यात. न्यायालयाने हाच मुद्दा संगणक व अन्य इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करण्याच्या बाबतीत मांडला. न्यायालयाने म्हटले की, गुन्ह्याशी संबंध त्या संगणकातील डेटाशी आहे. संगणक हे फक्त तो डेटा साठवून ठेवण्याचे व त्याचा हवा तेव्हा वापर करण्याचे साधन आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासासाठी आरोपीच्या संगणकातील हवा तो डेटा काढून घेऊन संगणक त्याला परत करायला हवा. तपासाच्या नावाखाली पोलीस आरोपीचा संगणक दीर्घकाळ जप्त करून ठेवू शकत नाहीत.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER