परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या निवडणुकीचा वाद सुप्रीम कोर्टात

jayshankar & SC

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या गेल्या ५ जुलै रोजी गुजरातमधून राज्यसभेवर झालेल्या निवडणुकीस आव्हान देणारे अपील सर्वोच्च न्यायालयात करण्यात आले असून न्यायालयाने त्यावर जयशंकर व अन्य प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे.

काँग्रेसचे नेते गौरव पंड्या यांनी या संदर्भात केलेली निवडणूक याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली होती. पंड्या यांनी आता त्याविरुद्ध अपील केले आहे. पंड्या यांच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुनावणीसाठी लवकरची तारीख देण्याची विनंती केल्यावर सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ८ डिसेंबर रोजी पुढील तारीख देऊन प्रतिवादींना नोटीस काढली.

अमित शहा व स्मृती इराणी आधी गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. नंतर लोकसभेवर निवड झाल्यावर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. त्या दोन जागा भरण्यासाठी ५ जुलै या एकाच दिवशी दोन निवडणुका घेण्यात आल्या. दोन्ही जागांसाठी एकत्र निवडणूक न घेता त्या स्वतंत्रपणे घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयास पंड्या यांनी आव्हान दिले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय भारतीय संविधान, लोकप्रतिनिधित्व कायदा व निवडणूक नियमावलीच्या विपरीत आहे.

पंड्या यांचे असेही म्हणणे होते की, राज्यसभा निवडणूक प्रमाणित मतदानावर होते. मते अग्रक्रमाने नोंदविली जातात व ज्याला पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते मिळतील तो निवडून येतो. गुजरात विधानसभेत काँग्रेसचे ७२ सदस्य असल्याने दोनपैकी एक जागा काँग्रेसला नक्की मिळू शकली असती. परंतु दोन जागांची निवडणूक स्वतंत्रपणे घेतल्याने दोन्ही जागा भाजपला जिंकता आल्या.

दुसऱ्या जागेवर भाजपाचे जुगलजी ठाकोर निवडून आले. त्याविरुद्ध चंद्रिकाबेन चुडासामा व परेशकुमार धनानी या काँग्रेस नेत्यांनी केलेल्या याचिकाही गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनीही सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER