तमसो मा ज्योतिर्गमय …

तमसो मा ज्योतिर्गमय ...

लोकांच्या मनात हल्ली कृतज्ञताभाव राहिलेला नाही. आमच्या काळी… आता आमच्या काळी असं कोणी म्हणालं की ती व्यक्ती म्हातारी झालीय असं समजा, असं पु. ल. देशपांडे म्हणाले होते. तरुण पिढीच्या कलाविष्काराबद्दल आश्वासकतेबद्दल आशावादी असलेले पु. ल. कायम उदयोन्मुख कलावंतांच्या पाठीवर शाबासकीची कौतुकाची थाप ठेवत. कोरोनाच्या संकटकाळात अशीच कृतज्ञता भावना कोल्हापुरातल्या नागरिकांनी व्यक्त केली आणि इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.

कोरोना भयग्रस्ततेच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्वच कार्यकर्मींसाठी देशभर टाळ्या, थाळ्या आणि जमेल ते वाजवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पण या संकटकाळात देव करो आणि डॉक्टरकडे जायची वेळ न येवो, अशीच कोणाचीही भावना असणार. त्यामुळे घरोघरी बसून टाळ्या, थाळ्या वाजवून देश तुमच्या सेवाकार्याची दखल घेतोय आणि तुमच्याबरोबर आहे, हा दिलासा या सर्व आरोग्यकर्मींचे मनोबल वाढवणारा ठरलाय, यात शंका नाही; पण आरोग्यकर्मींना पूरक अशी कामगिरी बजावतात, ते सफाई कर्मचारी आणि सफाईशी संबंधित स्थानिक पातळीवरचे सफाईकर्मी. रोज ज्यांच्याशी आपला संबंध येतो आणि आज कोरोनाच्या संकटकाळातही आपली कर्तव्यं बजावून नागरिकांना जे संभाव्य आरोग्य धोक्यापासून लांब ठेवत आहेत, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी, हा विचार कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतल्या सरनाईक कॉलनीजवळच्या सात इमारतीतल्या रहिवाशांच्या मनात आला.

साई, गुलमर्ग, शुक्रतारा, श्रेयस, पुष्कराज, जेएन आणि कृष्णा अपार्टमेंट या त्या सात इमारती. त्यातल्या रहिवाशांनी आरोग्यसेवक तसंच सफाई कर्मचारी आणि घंटागाडी सेवकांचा सत्कार केला. शाल फेटा आणि भरभराटीचे प्रतीक असलेले श्रीफळ देऊन त्यांनी हा सत्कार केला आणि वर या सर्वांना संकटकाळात अन्नधान्याची चणचण भासू नये, यासाठी जीवनावश्यक वस्तूही दिल्या. दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक शहाजी सूर्यवंशी यांनी या सर्वांचं कौतुक केलं आणि ते करत असलेली सेवा अनमोल आहे, असे गौरवोद्गार काढले. छावा संघटनेचे राजू सावंत यांनी हा कार्यक्रम म्हणजे समाजात असलेल्या सेवाकार्याचा प्रतीकात्मक सत्कार आहे, अशा शब्दांत या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

मुकादम मारुती दाभाडे, घंटागाडीचे हाजप्पा धाबेकर, चालक अभिजित पाटील, तानाजी राजहंस यांनी सत्कार स्वीकारला. दाभाडे यांनी सत्काराबद्दल मनोगत व्यक्त केलं. कोरोनामुळे आणि संशयितांची तसंच रुग्णांची संख्या रोजच्या रोज वाढत असताना समाजमनातही एक प्रकारची भीती निर्माण होत जाते. त्यामुळे अशा वेळी वेगवेगळ्या भागांमधे सामान्य नागरिक पुढे येऊन माणुसकीचा गहिवर आजही जिवंत आहे, हे दाखवून देत असतात आणि माणुसकीचे असे ठिकठिकाणचे दिवेच सगळा माहोल प्रकाशमय करतील आणि तमसो मा ज्योतिर्गमय… खऱ्या अर्थाने समाजाची वाटचाल प्रकाशदिशेने म्हणजेच अंधार दूर करण्याच्या दिशेने लख्ख करतील.