दोन दिवसांत घेणार स्फोटक पत्रकार परिषद; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

Chandrakant Patil

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग कसा  केला याची माहिती देण्यासाठी पुढील दोन दिवसांत स्फोटक पत्रकार परिषद घेणार आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. ते आज पत्रपरिषदेत बोलत होते. ते म्हणालेत, ग्रामपंचायत निवडणुकीत ज्या प्रमाणे भाजपाला यश मिळाले, तसेच यश नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतदेखील मिळाले होते; पण या निवडणुकीत आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला.

तो कसा हे लवकरच आपल्यासमोर मांडणार आहे. पदवीधर निवडणुकीत प्रचंड हेराफेरी झाली असा आरोप पाटील यांनी केला. मराठवाडा पदवीधरमध्ये पाच  हजार मतपत्रिका कोऱ्या निघाल्या. तर पुणे पदवीधरमध्ये २५०० नावं पदवीपेक्षाही कमी शिक्षण असलेल्यांची निघाली. धक्कादायक म्हणजे ११ हजार नावं दुबार होती, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हेराफेरीचे प्रात्यक्षिक दाखवणार

चंद्रकांत पाटील म्हणाले, शेवटच्या एका तासात ९०० पैकी ३०० बुथवर विक्रमी मतदान झाले. पदवीधरचे एक मतदान होण्यासाठी साधरण तीन मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, शेवटच्या एका तासांत एवढे  मतदान कसे झाले? असा सवाल त्यांनी केला. याचा अर्थ असा की, पदवीधर निवडणुकीत प्रचंड हेराफेरी झाली आहे. दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन झालेल्या हेराफेरीचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या खळबळजनक विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER