आरक्षणाचा भडका : मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न

मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) सकारात्मक ठोस निर्णय झाला नाही. आरक्षणाला स्थगिती मिळाली, याचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी मुंबईला जाणारे दूध रोखण्याचा प्रयत्न केला. गोकुळ दूध संघाच्या (Gokul Milk) गोकुळ शिरगाव प्रकल्प येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ वाजता ठिय्या आंदोलन केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

पोलीस भरती रद्द करा, शैक्षणिक शासनाने भरावे, सारथी संस्था सक्षम करा,

अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil) विकास महामंडळ स्वतंत्र अधिकार द्या, महामंडळास 50 कोटींचा निधी द्या,पूर्वलक्षी प्रभावाने आरक्षण जाहीर करा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याप्रकरणी न्यायालयात समाजाची बाजू मांडण्यात सरकार कमी पडल्याची भावना आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, यामागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटले आहे. मराठा समाजाच्या विविध संघटना आंदोलनात उतरल्या आहेत. संघटना दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी तावडे हॉटेल येथे महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला होता. जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यात एकाच वेळी तिव्र आंदोलन करण्याचा निर्णयही कार्यकर्त्यांनी जाहीर केला आहे. विविध संघटना आपल्यास्तरावर असंतोष व्यक्त करत आहे. त्यातूनच शहरात रोज निदर्शने करण्यात येत आहेत.

जिल्ह्यात काेरोना संसर्ग वाढलेला आहे. सोशल डिस्टन्सिग राखण्याचे मोठे आव्हान आहे. जमेल तितक्या कार्यकर्त्यांसह विविध संघटना रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र आहे. मराठा आरक्षण मागणीची तिव्रता शासनाच्या ध्यानात यावी, यासाठी दिवसेंदिवस आंदोलनाची व्याप्तीही वाढत असल्याचे दिसते. यापार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मुंबईला जाणार दूध पुरवठा रोखून धरण्याचा प्रयत्न केला. गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पावर मुंबईला जाणारी दुधाची वाहने कार्यकर्ते रोखून धरणार होती. मात्र, पोलिसांनी तसे करण्याची परवानगी नाकारली. यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध केला. यावेळी सचिन तोडकर, दिलीप पाटील, फत्तेसिंह सावंत, राजेंद्र चव्हाण, स्वप्निल पार्टे, सुनिल चव्हाण, नितीन देसाई,रविंद्र मुतगी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : मराठा आंदोलनाला आक्रमक सुरुवात ; दानवेंच्या घरासमोर ढोल बजाव, तर टोपेंना घेराव घालण्याचा प्रयत्न

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER