एक तरी ओवी अनुभवावी…

What does it mean to be modern?

आधुनिक होणे म्हणजे काय? याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. आजूबाजूला बघितल्यावर लोक आधुनिक होणे, कुठल्या कुठल्या क्रायटेरियावर ठरवतात हे लक्षात येतं. काही लोक ग्रामीण भागातील आपलं घरदार, शेतीवाडी सोडून शहरातली नोकरी स्वीकारतात .तेथे शिफ्ट होतात. आणि त्यांना वाटतं आम्ही आधुनिक झालो. काही जण किंवा काही जणी हे आपली राहणी, केशभूषा, वेशभूषा बदलतात आणि त्यांनाही आणि इतरांनाही वाटतं ते आधुनिक झाले. काही लोक घरच्या दररोजच्या कामांना क:पदार्थ लेखतात. आणि ती कामवाल्यांकडून करून घेतात. त्यांना वाटतं ते आधुनिक झाले , तर काही जण आपली घरं हॉटेलसारखी नटवून त्यांच्यात माणसांना मात्र मोकळेपणी जाऊ देत नाहीत. त्यांनाही वाटतं ते आधुनिक!मला वाटतं, आधुनिक होणे ही एक प्रोसेस आहे , एक प्रक्रिया आहे .

सुखी व समाधानी जीवनाकडे जाण्याची. त्यासाठी आपण टप्प्याटप्प्यांवर स्वतःमध्ये बदल करतो, स्वतःचे निरीक्षण आणि अवलोकन करतो . मग १५ दिवसांपूर्वी मी कोठे होते किंवा होतो त्याकडे वळून बघते किंवा बघतो. त्याला ‘सिंहावलोकन’ हा मोठा शब्द आहे . तेव्हा माझ्यात काय सुधारणा झाली याचे मोजमाप करतो ना ? ते माझ्या मते आधुनिक होणे !आधुनिकतेकडे वाटचाल करणे ही सुधारणा प्रत्येकासाठी त्याच्या वयानुरूप, आवडीनुसार, वेगवेगळी असू शकते. ती वैयक्तिक, कौटुंबिक, सांस्कृतिक असू शकते. काही वेळा तिला आध्यात्मिक अनुष्ठानदेखील असेल! पण ते आध्यात्मिक अनुष्ठान म्हणजे जर एखाद्या ग्रंथाचे केवळ पारायण करीत असू किंवा कुणाला तरी आंधळेपणाने अनुसरत असू किंवा इतरांच्या अनुभूतीने फक्त थक्क होत असू, तर त्यात किती तथ्य आहे ? त्यामुळे कदाचित आपले मनोरंजन होऊ शकेल .

फक्त देवस्थानाहून देवदेवतांचे फोटो घरी घेऊन आलात. अनुभूती मिळेल का? त्यापेक्षा आपण आपली साधना वाढवली, मनन, चिंतन केलं ,मनाने त्यातील शिकवण स्वतःमध्ये रुजवली तर नंतर ती स्वतःला आलेली ‘अनुभूती’ असेल, तो जो ‘दिव्यत्वाचा साक्षात्कार’ असेल ती खरी आपली आध्यात्मिक प्रगती ! त्या दृष्टीने मी सुधारले /सुधारलो, माझी प्रगती झाली असं मला वाटेल. सध्याची स्थिती थोडी अशीच आहे .सगळीकडे रेगुलर पोस्ट येत राहतात, आपल्याकडे माहितीचे खूप भांडार जमा होते. सध्याचा संघर्ष, आणीबाणी आणि किंवा प्रश्न , ज्ञान हा नाहीच ! तर आजचा संघर्ष आहे, त्या ज्ञानातून आपण काय घेतो याचा. त्याचा वापर करण्याचं तारतम्य? त्यातून मिळणारी क्रांती घडवणारी ऊर्जा ? त्यातून येणारे शहाणपण? याचा आज संघर्ष आहे , ज्याला आपण ‘अनालिटिकल क्रायसिस’ म्हणू शकतो.

शाळांमधून अनेक प्रोजेक्ट दिले जातात. ओके ! तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त कदाचित ते ठीक आहेत. आई-वडिलांकडून किंवा नेटवरून माहिती मिळवायची व प्रोजेक्ट तयार करायचा. त्यानिमित्ताने त्यांना योग्य कारणासाठी नेट वापरायची सवय लागते. पण नववी-दहावीच्या मुलांनाही दिलेले असे प्रोजेक्ट! त्यातून ती मुले काय शिकतात? त्यातून त्यांना काय अनुभव मिळतो? काय ऊर्जा मिळते? काय मिळवण्यासाठीची धडपड? कशासाठी हे सगळं? फ्रेंड्स! वाचकांचेही असे दोन प्रकार आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे , काही वाचक वर्ग त्याला ॲप्रिसिएट करतो की, ” हा ! अगदी बरोबर ! मलाही अगदी असंच वाटतं ! ” असं म्हणणारा ! याला पण ‘कन्फर्मेशन बायस’ म्हणू .

दुसरा एक वाचक वर्ग जो केवळ समाजमाध्यमे उपलब्ध आहेत आणि आता कोरोना काळात वेळ आहे म्हणून वाचतात आणि त्यांना आवडतंही ! ज्याने आमच्यासारख्या लिहिण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रेरणा नक्कीच मिळते, ती दादही मनापासून असते. पण मला असं वाटतं, यातील अमलात आणणारा वर्ग किती असेल? याचा बरेचदा प्रश्न पडतो. माझाच बघा ना! लिहिताना प्रत्येक वेळी काही उद्देश होता. काही सणांच्या निमित्ताने मी त्या सणाकडे बघण्याची नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा जे सामाजिक प्रश्न समोर दिसले, त्याचा ऊहापोह मानसशास्त्रीय अंगांनी करण्याचा प्रयत्न होता. काही जीवनकौशल्ये किंवा जीवनातील वाटचाल यशस्वी करण्यासाठी उपयुक्त टूल्स तुमच्या हातात देण्याचा उद्देश होता ,तर कधी तुमचे व्यक्तिमत्त्व चहू अंगांनी फुलावे ह्या इच्छेतून लिखाण केले गेले.

आतापर्यंत जे काय लिहिले त्याचा आढावा घेण्याची मला गरज वाटते. तुम्ही ते किती वाचलेत ? माहिती नाही !पण कमीत कमी तुम्ही ते आता तरी वाचावे, जे पोर्टलवर उपलब्ध आहेत आणि याहीपुढे मी असंच जास्तीत जास्त चांगलं तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे. किंबहुना मीसुद्धा माझ्या कालच्या लिखाणापेक्षा आजचं लिखाण जास्त चांगलं कसं होईल याचा प्रयत्न करतेच आहे. परंतु तुम्ही त्यातील ओवी किंवा तत्त्व निवडून अनुभवणार आहात, अंगी करणार आहात, त्यासाठी हा धावता आढावा !आजच्या लेखात फक्त स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने कुठले लेख होऊन गेलेत याचा थोडा ऊहापोह असेल तर उद्याच्या भागांमध्ये इतर सामाजिक प्रश्न, मानसशास्त्रीय प्रश्न आणि इतर काही विषय हाताळले गेले त्याचा आढावा घेऊ. फ्रेंड्स ! सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त अवलंबून असतात त्या आपला आतला आवाज किंवा स्वसंवाद काय असतो यावर ! तो जर सकारात्मक असेल ,आशावादी असेल तर आयुष्यही उजळून निघतं!

हे सांगणारा लेख होता, ‘शुभ बोल रे नाऱ्या!’ बरेचदा आपण मानसिक अनारोग्य नकळत लपवण्यासाठी उत्स्फूर्तपणे आपल्या मनाकडून काही यंत्रणांचा वापर करीत असतो. त्यातील काही यंत्रणांचा परिचय ‘नाचता येईना अंगण वाकडे’ यातून केला. ‘माझी शोधयात्रा’ या लेखातून SWOTऍनॅलिसिस, अर्थात स्वतःच्या गुणदोषांची यादी करायचं ठरवलं, तर ‘संकल्प ते साध्य’, ‘झेंडा, दिशा व वाटा’ यातून गोल सेटिंग प्रक्रियेविषयी विचार केला. त्यासाठी ‘ईकीगाई’ यासारख्या तत्त्वाचा उपयोग करून आपलं परिपूर्ण असं ध्येय कसं शोधायचं ते सविस्तर पद्धतीनं ठरवलं.

‘घटाघटाचे रूप आगळे’ यातून काही प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेऊन अतिशय सहजपणे हे सगळं स्वतःला लावून बघायला प्रोत्साहित केलं. तर आजची भीषण समस्या निराशा ही ‘नैराश्य कृष्ण मेघी’ लेखात मांडली आणि त्यावरच्या उपाययोजना ‘फिटे अंधाराचे जाळे’ याद्वारे त्यावर चर्चाही केली. सुसंवाद साधण्यासाठीच्या ‘ट्रांजेक्शनल अनालिसिस’ या पद्धतीविषयी तर सविस्तर खूप बोललो. यातून आयुष्यात नातेसंबंध जपताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न केला.

अजूनही बऱ्याच व्यक्तिमत्त्वविषयक गोष्टींची चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मला दैनंदिन व्यवहारात वावरताना स्वतःला असं जाणवलं की “हा! हा बदल माझ्यात माझ्या लिखाणामुळे झालाय!” फ्रेंड्स ! उरलेला धांडोळा आपण उद्याला घेऊ . आणि मी तुमच्या भेटीला दररोज येतच राहणार आहे. पण आता तरी मनातून एकच इच्छा आहे की , तुम्ही यातली नेमकी कोणती ओवी अनुभवणार आहात, कुठली अनुभूती घेणार आहात? संतांच्या शिकवणीप्रमाणे ‘एक तरी ओवी अनुभवावी’ तेव्हा चला तर मग आपापले अध्याय निवडा, की जे यानंतरही नेहमीकरिता तुम्हाला उपयोगी पडतील.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER