कर्जमाफीसाठी शासकीय सुट्टीच्या दिवसाचा कालावधी वगळा : आ. ऋतुराज पाटील ना.टोपे

मुंबई :- महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना कागदपत्रे ऑनलाईन पध्दतीने  अपलोड करताना प्रतिज्ञापत्राची आवश्यकता भासल्यास शासकीय सुट्टीच्या दिवसाचा कालावधी वगळावा, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे केली.ना.टोपे यांनी आ.पाटील यांच्याशी याबद्दल सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. राज्यातील हजारो गरजू लोकांशी निगडित असलेल्या या प्रश्नाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या वतीने सुरु असेलेल्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना (पुर्वीची राजीव गांधी जीवनदायी योजना) मधून अनेक गरजू व गरीब रुग्णांना चांगल्या पध्दतीने उपचार होतात. या योजनेतून दीड लाख रुपये पर्यंतची मदत रुग्णास मिळत असल्याने गरजेचे वेळी योग्य उपचार घेणे त्यांना शक्य होते.उपचार करताना आवश्यक कागदपत्रे घेऊन ती संभाधित हॉस्पिटलकडून ऑनलाइन पद्धतीने अपलोड केली जातात. कोल्हापूर जिल्हयातून प्रत्येक महिन्याला साधारणपणे पाच हजार हून अधिक लोक यातून उपचार घेतात. या योजनेतून रुग्णांवर उपचार करत असताना ज्या शस्त्रक्रिया सोईनुसार केल्या जातात त्यावेळी आवश्यक कागदपत्रे जमा करणेबाबत संबंधीत हॉस्पीटल कडून आगाऊ सूचना दिल्या जातात. ही कागदपत्रे जमा करताना बऱ्याचदा एकाच व्यक्तीच्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड या सारख्या कागदपत्रांवर नावामध्ये किरकोळ स्वरुपाचा फरक असतो. जर शस्त्रक्रिया करण्यासाठी पुरेसा अवधी असेल तर या नावातील फरकाबाबत रुग्ण प्रतिज्ञापत्र करुन घेऊ शकतात. पण जर एखाद्या रुग्णावर तात्काळ शस्त्रक्रिया करायची असेल आणि कागदपत्रातील नावामध्ये फरक असेल तर संबंधीत हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु केले जातात; पण ७२ तासांच्या आत नावातील या फरकाबाबतचे प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक असल्याचे रुग्णास सांगितले जाते. जर या कागदपत्रांची वेळेत पुर्तता झाली नाही आणि शासनाकडून ही रक्कम मिळाली नाहीतर होणाऱ्या बिलाची रक्कम रुग्णाच्या नातेवाईकांकडून घेतली जाईल असे काही वेळा नातेवाईकांना सांगितले जाते.

जर सलग जोडून सुट्टया असतील तर नावातील हया फरकाबाबत प्रतिज्ञापत्र करताना रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागते.सध्या शासकीय कामासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे.त्यामुळे याला जोडून सलग सुट्ट्या येण्याचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सलग सुटलाय आल्यास बऱ्याचदा दिलेल्या ७२ तासांच्या अवधीत प्रतिज्ञापत्र मिळू शकत नाही. अशी परिस्थिती उदभवल्यास रुग्णाच्या शस्त्रक्रियेमुळे भांबावलेलल्या नातेवाईकांची अधिक तारांबळ उडते. त्यामुळे अशा स्वरुपाचे प्रतिज्ञापत्र करत असताना जोडून सुट्टया येत असतील तर सुट्टीचे हे दिवस वगळून ७२ तासांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मुभा नातेवाईकांना द्यावी. जेणेकरुन गरजु व गरीब रुग्णांना या योजनेचा अधिक लाभ मिळू शकेल,अशी विनंती आ.पाटील यांनी केली आहे.