महाविकास आघाडीत खळबळ; नाना पटोलेंनी दिला स्वबळाचा नारा!

मुंबई :  कॉंग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडे जाणार असे बोलले जात आहे. नाना पटोले यांनी तसे संकेतही दिले होते. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. याबाबत त्यांनी सूचक विधानही केलं आहे.

मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत ( Mahavikas Aghadi) खळबळ माजली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. सरकार भक्कम असून पुढील निवडणुकांमध्येही तिन्ही पक्ष एकत्र असतील असं वारंवार तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान नाना पटोले यांनी राज्यात स्वबळावर पक्ष सत्तेत कसा येईल असं सांगत सूचक विधान केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, “आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल.” दरम्यान गुरुवारी नाना पटोले पाडळे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी लवकरच मला नवी भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदावर असेपर्यंत नागरिकांची काही कामे तातडीने करणार आहे, असं सूचक वक्तव्य केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER