उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा मारत पकडली सव्वा लाखांची गावठी दारू

Excise department raids seize village liquor worth Rs 1.5 lakh

रत्नागिरी : निवळी-जयगड मार्गावर गावठी हातभट्टीच्या दारूची बेकायदेशीरित्या वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून १ लाख २६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची टीम निवळी-जयगड दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना एक अल्टो कार चाफे तिठ्यावर अडवण्यात आली. गाडीची तपासणी केली असता कारमध्ये ४० लि. मापाच्या गावठी हातभट्टी दारुने भरलेल्या ७ रबरी टयुब व अंदाजे ३० लि. मापाचे प्लॅस्टिकचे ०७ कॅन व अंदाजे २० लि. मापाची एक गावठी हातभट्टी दारुने भरलेली रबरी टयुब अशी एकूण ५१० लि. गावठी हातभट्टी दारु मिळून आली. लाखो रुपयांची दारू मिळून आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कार मधील मिनार रायबा पाटील, रा. मिरजोळे-पाटीलवाडी, रत्नागिरी व शुभम सुरेश वरेकर, रा. मजगाव, किर्तीनगर ता. जि. रत्नागिरी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ)(ई)८१, ८३ व ९० अन्वये गुन्हा नोंद करुन त्यांच्या ताब्यातील गावठी हातभट्टी दारु व वाहनांसह १ लाख २६ हजार ५५० रुपये किंमतीचा दारुबंदी गुन्हयातील मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई विभागीय उप-आयुक्त वाय.एम.पवार, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी अधीक्षक, डॉ.बी.एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी भरारी पथकचे निरीक्षक शरद अंबाजी जाधव, जवान मानस पवार, वैभव सोनावले यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER