या फूटबॉलपटूची अनोखी हॕट्ट्रीक! तिन्ही मुलांची सारखीच जन्मतारीख- 8 एप्रिल!!

Maharashtra Today

विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण एक अतिशय आश्चर्यजनक बातमी आहे की एका आंतरराष्ट्रीय फूटबॉलपटूला तीन मुले आहेत आणि तिघांचीही जन्मतारीख एकसारखीच आहे. म्हणजे त्याला तिळे झाले असतील असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे कारण ही तीन मुले त्याला पाच वर्षांच्या अंतरात झाली आहेत, मात्र तिघांचीही जन्मतारीख एकच आहे ती म्हणजे 8 एप्रिल!

हा अविश्वसनीय योगायोग घडून आलाय तो फ्रेंच फूटबॉलपटू अंतोईन ग्रिझमानच्या ( Antoine Griezmann) बाबतीत. 30 वर्षांच्या या फूटबॉलपटूला तीन मुले आहेत, दोन मुले आणि एक मुलगी! तिसऱ्या मुलाचा जन्म गुरुवार, 8 एप्रिल रोजी झाला पण अंतोइन आणि त्याची पत्नी एरिका चोपेरेना ( Erika Choperena ) यांना मुलांची जन्मतारीख लक्षात ठेवायचा प्रश्नच उरला नाही. कारण त्याच्या पहिल्या दोन्ही मुलांचीही जन्मतारीख 8 एप्रिलच आहे.

अंतोईन व एरिका या दाम्पत्याला पहिले अपत्य झाले ती मुलगी. तिचे नाव मिया. 8 एप्रिल, 2016 रोजी मिया हिचा जन्म झाला.

तीन वर्षानंतर ह्याच दिवशी म्हणजे 8 एप्रिल 2019 रोजी अंतोईन व एरिका या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव त्यांनी ठेवले अमारो!

आणि आता विलक्षण योगायोग पहा.. आता पुन्हा अंतोईन पिता बनला आहे आणि यावेळीसुध्दा त्याच्या घरी बाळाचे आगमन 8 एप्रिललाच झाले आहे. यावेळीसुध्दा पुत्ररत्न असून अंतोईन व एरिका यांनी त्याचे नाव अल्बा ठेवले आहे.

याप्रकारे अंतोईन व एरिका दाम्पत्याला 2016, 2019 व 2021 मध्ये अपत्यप्राप्ती झाली आणि तिघांचीही जन्मतारीख एकच म्हणजे 8 एप्रिल आहे. असा योगायोग क्वचितच कुणाच्या आयुष्यात आला असेल.

अंतोईन हा फ्रान्स व एफ.सी. बार्सिलोनाचा खेळाडू असून त्याने फ्रान्ससाठी 89 सामन्यात 35 गोल केले आहेत. बार्सिलोनासाठी 62 सामन्यात 17 गोल त्याच्या नावावर आहेत. युरो 2016 स्पर्धेत तो प्लेयर.आॕफ दी टूर्नामेंट ठरला होता. 2018 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याचे दुसरे सर्वाधिक गोल होते आणि फ्रान्सच्या विश्वविजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती.