परीक्षा : स्मरणशक्तीची !

10th-12th class students will pass without exams

दहावी-बारावीच्या आणि इतरही शालेय परीक्षा आता जवळ येत आहेत. त्या ऑफलाइन होणार की ऑनलाईन हे अजून माहीत नाही. परंतु त्यासाठी आता अभ्यासाला लागावे लागणार ! अभ्यास सुरू करताना कुणाचा अभ्यास छान होतो किंवा कोणाचा लवकर होतो म्हणजे कोणाच्या लवकर लक्षात राहतो त्याला आपण हुशार म्हणतो सर्वसाधारणपणे ! आपण मुलांना शब्द आणि वाक्य लक्षात ठेवण्यासाठी मागे लागतो. परंतु प्रत्यक्षात बुद्धिमत्ता आणि लक्षात ठेवणे यात फरक आहे, लक्षात राहण्यामागे कोणत्या गोष्टी असू शकतात याचा विचार करतच नाही. पण जरा विचार केला तर लक्षात येतं ,आपण जेव्हा एखाद्या शब्दाचा उच्चार करतो, त्यावेळी डोळ्यासमोर त्याचा चित्र येत आता या क्षणी जो शब्द आपल्या मनात असेल, उदाहरणार्थ ऊन , तर ते डोळ्यासमोर येणार ! कदाचित जाणवणारही ! पण अशावेळी लिखित शब्द डोळ्यासमोर येत नाही. कुठलाही उदाहरण घेऊन तुम्ही प्रयत्न करून बघा.

आपण मात्र मुलांना सरळ-सरळ अनोळखी शब्द लक्षात ठेवायला सांगतो. त्या ऐवजी त्या शब्दाबरोबर त्यांच्या मनात जर एखाद चित्र उभं केलं,त्यांच्या भावना त्यासोबत जोडल्या गेल्या तर त्यांची स्मरणशक्ती त्या शब्दासोबत वाढू शकते. चित्ररूपी शब्द उजव्या मेंदूत जाऊन बसतो आणि कायम लक्षात राहतो. उदाहरणार्थ शिवाजीमहाराजांनी एखाद्या गडावरची स्वारी केली तेव्हाचा प्रसंग. त्यावेळी धडा वाचताना शिवाजी महाराजांच्या बाजूला विद्यार्थी उभे आहेत आणि मग त्यांचा घोडा, त्यांचा, वेष, गड, गडाचा परिसर, मावळे, त्यांचं शौर्य ,कोण कुठे उभे असतील ?पहिल्या चढाईत काय झालं ?….. असं सगळे चित्र रुपात उभा केलं तर ? करता येईल की !

बरेचदा मुलांची बुद्धिमत्ता चांगली आहे पण त्यांच्या लक्षातच राहत नाही ही तक्रार असते. मग परत परत घोकलेली वाक्य परीक्षेला लक्षात ठेवायचा प्रयत्न केला जातो, कदाचित या परीक्षेचे पुरते ते लक्षातही राहतील, पण चित्र बनवून ठेवली तर आयुष्यभर ते स्मरणात राहतात. आजकाल मोठ्या प्रमाणात फ्लॅश कार्ड उपलब्ध असतात, पण त्याचा वापर मात्र किती होतो माहीत नाही. चित्र साठवण्याचे काम उजवा मेंदू करतं तर त्याचा परत शब्दात रूपांतर करण्याचं काम डावा मेंदू करतो.

मला लहानपणी असा अनुभव यायचा की प्रश्नाची उत्तरे पूर्ण डोळ्यासमोर यायची,आता पुढचा मजकूर पान उलटून आहे हे लक्षात यायचं, अगदी जिथे खोडखाड झालीये, ते पण जसंच्या तसं दिसायच. थोडक्यात फोटोजेनिक मेमरी आहे ही! स्मरणाचे किंवा अध्यायनाचे काही प्रकार असतात. त्यापैकी व्हिज्युअल मेमरी ही जास्त स्ट्रॉंग असते. ज्याचा उल्लेख आपण आता चित्रांच्या संदर्भात करतो आहे. प्रत्येकाची वेगवेगळी स्मरण शक्ती चांगली असते. त्याचाही अंदाज घेता येतो. काहींचे ऐकून जास्त लक्षात रहात तर काहींचे प्रत्यक्ष हाताळून बघितल्याने !

म्हणून एखादा भाषेचा पाठ शिकवताना तो पूर्णपणे डोळ्यासमोर उभा करण्याचे कौशल्य शिक्षकांनी कमवाव. काही वेळा ते शक्य नसतं तिथे प्रत्यक्ष चित्र दाखवता येतात. जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत मानवाचा पुतळा त्याचे अवयव व त्याची कार्य हे शिकवली, तर ते लक्षात राहते हा अनुभव सगळ्यांनाच असतो .त्याचप्रमाणे एका गणिताच्या शिक्षकांनी थेट मैदानावर खांबाला दोऱ्या लावून पायथागोरस शिकवला. जे लक्षात ठेवायचा आहे, त्यामागचे कारण समजावून देणे महत्त्वाचे ठरते. हे लक्षात का ठेवायचे ?त्याचा व्यवहारात उपयोग काय ? हे माहीत नसेल तर विद्यार्थी कंटाळतीलच ! म्हणून त्या विषयाचा प्रत्यक्ष अनुभव व त्याचे विस्तारित स्वरूप समजावून देणे गरजेचे ! आपल्याला फार क्वचित या ठिकाणी जावे लागते, तेथील रस्ते लक्षात नसतात. बरेचदा असं होतं की आपण ज्या खुणा लक्षात ठेवलेल्या असतात ती दुकाने किंवा बिल्डिंग नव्या झालेल्या किंवा नाहीशा झालेल्या असतात . मग जर कुणी पश्चिमेला जा, मग डावीकडे वळा, नंतर गल्लीत उजवीकडे वळा असं सांगितलं तर ते लवकर लक्षात राहत नाही ,त्या ऐवजी जर नकाशा काढून दिला तर पटकन लक्षात राहत. आताचा जो गुगल मॅप आहे तो एक प्रकारचा शब्द चित्र असत ना !

त्याचबरोबर एखादा विषय आवडतो की नावडतो हे त्या विषयाचे शिक्षक कसे शिकवतात यावर देखील अवलंबून असतं. एखाद्या गोष्टीच्या रुपाने, मुलांची भाषा ओळखून जे शिक्षक शिकवतात त्यांचे लवकर कळते. बऱ्याच वेळी विविध संज्ञा, किंवा व्याख्या, पाढे, सूत्र या सगळ्यांना गाण्याच्या चाली लावल्या तरी ते सोपे जाते.

लिखाणाच्या दोघांमध्ये एक मुद्दा सांगावासा वाटतो. ज्याचा प्रत्यक्ष चित्रांशी संबंध नाही. परंतु ज्याचा संबंध स्वतःविषयीच्या मन:चित्राशी आहे, आणि जो यशामध्ये महत्त्वाचा भाग ठरतो. कोणताही पालक सहसा आपल्या मुलांच्या शक्तीविषयी वा यशस्वीते विषयी कल्पना करायची म्हटली, तर उज्वल भविष्य चित्र एकदम डोळ्यासमोर सहसा कुणाला येत नाही. कुठेतरी साशंकता ही असतेच. पण मुळात जन्माला येणारे प्रत्येक मुल विशिष्ट शक्ती घेऊन आणि समाजाला काहीएक देण्याची क्षमता घेऊनच जन्मते. पण त्याची किंमत किंवा कल्पना नसल्याने त्याला कमी लेखणे, वाव न देणे, या गोष्टी घडून बर्‍याच शक्ती बाल्यावस्थेतच चिरडल्या जातात. त्याबरोबरच प्रत्येक मूल’ स्व’ च्या अस्तित्वाचा आणि स्वतःविषयी इतरांच्या संदर्भात स्वतःला तपासण्याचा ही प्रयत्न करत असते. मुलाचे किंवा व्यक्तीचे स्वतः विषयीचे मन: चित्र जितके छान ,तितकी प्रसन्नता ते अनुभवते. त्याच्या विकासात या गोष्टीचा फार मोठा वाटा असतो हे देखील विसरून चालणार नाही.

मुलांची बुद्धिमत्ता कशी, किती लक्षात राहते याने ठरत नाही. सहसा मुले कमी बुद्धीची नसून सर्वसामान्य असतात .पण सुरुवातीपासूनच त्यांना स्पून फीडींग ची सवय लावलेली असते. यामध्ये शाळा आणि पालक दोघेही जबाबदार असतात .केवळ अभ्यासातच नाही, तर घरी देखील अगदी कुठलच स्वतःचं कामही मुलांना स्वतःला करून दिलं जात नाही. ठरलेली पुस्तक, त्यावरचे ठरलेले प्रश्न आणि त्याच्या सोडवण्याच्या त्याच पद्धती. या पद्धतीनेच मुले मोठी होतात.

मग त्याऐवजी उत्तरायण, दक्षिणायन शिकविताना दर वेळा, एकाच ठिकाणी उभे राहून मोबाईलवर दर आठ दिवसांनी सूर्याचे फोटो काढायला सांगून नंतर त्याचे प्रेझेंटेशन बनवले आणि मॉडेलही बनवायला सांगितले. तर मुलं त्यामध्ये गुंतली जातातच पण सूर्य व पृथ्वी यांच्या कक्षा, दिवस, रात्र ऋतू कसे बदलतात, ग्रहण कशी लागतात हे सगळं समजायला खूप कमी वेळ लागतो. म्हणजे बुद्धिमत्ता तर तिचं !मग फरक कुठे पडला ? तर मुलांची अभ्यास पद्धती बदलली ज्याला “सेल्फ स्टडी “म्हणता येईल. अलीकडे बरीच मुले कोडींग आणि कंप्यूटर प्रोग्रामिंग वगैरे करू शकतात. परंतु त्यांना आयदी किंवा आळशी बनवण्याचे काम आपली अभ्यास पद्धती करते. एखादी गोष्ट समजून घेणे, त्यावर प्रश्न निर्माण होणे, त्यासाठी संदर्भ लायब्ररीतून शोधणे, नेट सर्च करणे, (लायब्ररी चा वापर केल्यास आणखीन काही गोष्टी कळू शकतात) आणि मग जे कळले, ते स्वतःच्या शब्दात लिहिणे याला महत्त्व आहे. त्यासाठी सगळं काही रेडीमेड हातात न देणं. हे आवश्यक आहे.

शब्द पाळणे, हाती घेतलेले काम पूर्ण तडीला नेण्याची सवय, नवीन शिकण्याची धडपड कायम ठेवणं हे पालक आणि शिक्षकांकडून साधणे गरजेचे असते. मुख्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. त्याचे हे वेगळेपण मान्य करावे लागते .तरच तो विद्यार्थी स्वतःचा असा ठसा निर्माण करू शकतो. बरेचदा शाळांमधून एका विशिष्ट पद्धतीने जर गणितं सोडवली तरच बरोबर दिल्या जातात. दुसरी मेथड चालत नाही. पण जर योग्य असेल म्हणजे काहीही करून मारून मुटकून उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला नसेल, तर त्या विद्यार्थ्यालाची वेगळेपणाने काम करण्याची इच्छा शक्ती दडपून टाकू नये.

ज्या वेळेला आपण प्रत्येक कामांमध्ये आपला वेगळा असा ठसा उमटवतो ,त्यावेळी त्यातून स्वतःचं वेगळेपण कळून स्वतःचा वेगळा रंग कळतो ,गुणवत्ता कळते,आपल्यातील शक्तिस्थाने कळतात, आत्मविश्वास वाढतो आणि या वेगळ्या रस्त्यावरून चालताना ती कार्यप्रक्रिया किंवा प्रवासातही आपण रममाण होऊ शकतो. मग परीक्षा येतात आणि जातात,त्या शाळेच्या असोत नाहीतर आयुष्यातल्या ! स्वतःचे वेगळेपण जपत, आणि वेगळा रंग जपत आपण हा प्रवास एन्जॉय करणं हा जगण्याचा महोत्सव करतात.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER