मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली; ATSचा खुलासा!

Mansukh Hiren - ATS - Maharashtra Today

मुंबई : एटीएसचे (ATS) प्रमुख जयजित सिंग (Jaijeet Singh) यांनी आज पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. यात मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्याप्रकरणाची सविस्तर माहीती दिली. मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली? याप्रकरणात पोलीस निरीक्षक सचिन वाझे याचा संबंध काय? यात कोणाकोणाला कामाला लावले? याप्रकरणाचे धागेदोरे गुजरातपर्यंत कसे गेले? आदी सर्व माहिती जयजित सिंग यांनी दिली. हिरेन यांची हत्या हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे, असे स्पष्ट होत आहे.

एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांनी सांगितले की, “दिनांक ६ मार्चला मुंब्रा पोलिसाने हिरेन हत्याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला. ७ मार्चला याबाबतची कागदपत्रे ताब्यात घेतल्यानंतर त्याच दिवशी विमला हिरेन यांचा जबाब नोंदवला. यावेळी त्यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) याने मनसुख यांचा खून केला असावा, असा संशय व्यक्त केला. त्याचदिवशी खून, पुरावे नष्ट करणे आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल केला. नंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनास्थळी म्हणजे मुंब्रा खाडी परिसरात गेल्यावर काहीच पुरावे आढळले नाही. मृतदेहाच्या अंगावरही पुरावे आढळले नाही.”

वाझेनी आरोप फेटाळले
८ मार्चला सचिन वाझेचा मनसुख हिरेनप्रकरणी जबाब नोंदवला. यावेळी वाझेनी सर्व आरोप फेटाळले. स्कॉर्पिओ गाडी ताब्यात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हिरेनला ओळखत नसल्याचेही स्पष्ट केले. वाझेनी या गुन्ह्यात सहभाग नसल्याचे सांगितले. मात्र, काहीशे पुरावे मिळाले असून तपास सुरू आहे. वाझे याचा गुन्ह्यात नेमका काय सहभाग आहे, याचा शोध घेत आहोत, असे जयजित सिंग म्हणाले.

बुकीकडे सीमकार्ड सापडले अन्…
हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास करताना सीम कार्डचा शोध लागला. एका बुकीकडे सीमकार्ड सापडले. हे सीम कार्ड गुजरातच्या एका कंपनीच्या नावावर आहेत. बुकी नरेश गौर याने वाझेच्या सांगण्यावरून हे सीमकार्ड निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदेकडे दिले. २१ मार्चला नरेश गौर आणि विनायक शिंदेला अटक केले, असे जयजित सिंग यांनी सांगितले.

पॅरोलवर सुटलेल्या शिंदेकडून गुन्हा कबूल
विनायक शिंदे हा लखनभय्या चकमकीतील आरोपी आहे. त्याला याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, कोरोनामुळे तो पॅरोलवर सुटला आहे. हिरेन यांना विनायकनेच त्या दिवशी बोलावून घेतले. हा गुन्हा नेमका कसा करण्यात आला, याची माहिती विनायकने एटीएसला दिली आहे. त्याचे प्रात्यक्षिकही घटनास्थळी जाऊन केले. या प्रकरणात सर्व माहीती गोळा करून त्याचे विश्लेषण सुरू आहे. या प्रकरणात १४ सीमकार्डपैकी काही सीम कार्ड अ‍ॅक्टिव्ह केले आहे. तसेच काही सीमकार्ड आणि मोबाईल नष्ट करून आरोपींनी सीसीटीव्ही फुटेजही नष्ट केले, असेही त्यांनी सांगितले.

बरेच लोक ATSच्या रडारवर
दमनमध्ये एक कार जप्त करण्यात आली. ही कार गुन्ह्यात वापरली की नाही, याबाबत प्रयोगशाळेत तपास सुरू आहे. या प्रकरणात सखोल चौकशीनंतर अनेकांना अटक होणार. ATSकडे संशयित नावे आहेत. पुरावे मिळताच या सर्वांना अटक केली जाईल, तसेच या प्रकरणात काही महत्त्वाचे साक्षीदार आहे. ते साक्ष देण्यास तयार असल्याचेही सिंग यांनी स्पष्ट केले.

वाझेंना ताब्यात घेणार
सचिन वाझे हा एनआयएच्या ताब्यात आहे. ATSला वाझेची कसून चौकशी करायची आहे. यासाठी त्यांनी ट्रान्स्फर वॉरंटसुद्धा घेतले आहे. २५ तारखेला एनआयए कोर्टात सुनावणी होणार असून यावेळी वाझेला ATSच्या ताब्यात देण्याची विनंती याचिकेद्वारे करण्यात येणार आहे. या गुन्ह्यातील मूळ सूत्रधारांना लवकरच अटक करण्यात येईल, असेही ATS प्रमुख जयजित सिंग यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER