राष्ट्रवादीतील प्रवेश बारगळल्याने महेश कोठेंची राजकीय अडचणीत वाढ

Mahesh Kothe

मुंबई : शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करण्याचा निर्णय माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरला आहे . कीकडे राष्ट्रवादीत प्रवेश न मिळणे हे अनपेक्षित असताना दुसरीकडे कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी झाली आहे. नजीकच्या काळातही कोठे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता धुसर झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत .

कोठे यांची राजकीय अडचण वाढण्यामागे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar shinde)यांची व्यूहरचना कारणीभूत असल्याचे मानले जाते. शिंदे आणि कोठे यांच्यात राजकीय कटुता सर्वश्रुत आहे.

दरम्यान, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या मुद्दय़वर हात वर केले. राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता सांभाळताना तिन्ही पक्षांना आघाडी धर्माचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोठे यांची राजकीय अडचण असल्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले.

यापूर्वी काँग्रेस व नंतर शिवसेना आणि नंतर शिवसेना बंडखोर म्हणून सलग तीनवेळा विधानसभा निवडणूक लढवूनही कोठे यांना आमदारकीचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्यामुळे आता पुन्हा आमदारकीची अपेक्षा बाळगून कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय स्वत: जाहीर करताना त्यांनी यासंदर्भात शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचाही दावा केला होता. त्यानुसार मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी कोठे आपल्या समर्थकांसह मुंबईला गेले होते. परंतु त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकला नाही .

ही बातमी पण वाचा : कट्टर विरोधक असलेले नरेंद्र पाटील उदयनराजेंच्या भेटीला, चर्चेला उधाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER