पाटलांच्या ‘त्या’ विधानानंतरही राष्ट्रवादीचा माजी आमदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

नागपूर : भाजपने निवडणुकीच्या काळात जी दुसऱ्या पक्षातून आलेल्यांसाठी ‘मेगाभरती’ केली, ही चूकच होती. असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यानंतरही विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा नेता भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया हे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते.

यवतमाळ विधानपरिषदेसाठी जिल्ह्याबाहेरील शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने राष्ट्रवादीचा माजी आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.

यवतमाळमधील शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत विधानसभेवर निवडून आल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या 24 जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनाच्या उमेदवारासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही अर्ज भरण्यास उपस्थित होते. यवतमाळ विधानपरिषद निवडणूक आम्ही जिंकू. महाविकास आघाडीच्या कुठल्याही स्थानिक नेत्यांची नाराजी नाही, असं अर्ज भरताना काँग्रेस मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले होते. मात्र संदीप बाजोरिया यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

परंतु, शिवसेनेचे निष्ठावंत नेते आणि माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी उमेदवारी दाखल केल्याने शिवसेनेत बंडखोरीची चर्चा आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा दुरंगी सामना न राहता चुरशीचा झाला आहे.