पैशांसाठी करिश्माने लग्न केल्याचा माजी पती संजय कपूरचा आरोप

Maharashtra Today

करिश्‍मा कपूर (Karisma Kapoor) आणि तिचा पती संजय कपूर यांचा घटस्फोट होऊन पाच-सहा वर्षे झाले असली तरी त्यांच्या घटस्फोटाची नवलाई अजून संपलेली दिसत नाही. कधी कधी करिश्मा कपूर संजय कपूरवर विविध आरोप करून त्यामुळे घटस्फोट घेतल्याचे सांगते तर कधी संजय कपूर घटस्फोटाचे मुख्य कारण करिश्मा कपूरच असल्याचे सांगतो. काही महिन्यांपूर्वी करिश्माने संजय कपूरवर प्रचंड मोठा आरोप केला होता. ऐन हनीमूनच्या दिवशी संजय कपूरने त्याच्या मित्रांकडे करिश्माची बोली लावल्याचे करिश्माने म्हटले होते. खरे तर हा एक प्रचंड खळबळजनक आरोप होता. पण संजय कपूरने त्यावर उत्तर दिले नव्हते. आता मात्र संजय कपूरने करिश्माने केवळ पैशांसाठी लग्न केल्याचा आरोप केला आहे.

कपूर घराण्यातील करिश्मा ही पहिली मुलगी जिने बॉलिवूडमध्ये नायिका म्हणून प्रवेश केला होता. त्यापूर्वी कपूर खानदानातील कधीही कुठल्याही स्त्रीने रुपेरी पडद्यावर आगमन केले नव्हते. करिश्माने अल्पावधीतच यश मिळवले होते. ९० च्या दशकात करिश्माचे बॉलिवूडवर राज्य होते. जवळ जवळ प्रत्येक नायकाबरोबर करिश्माने सिनेमे केले आणि ते हिटही झाले. करिअरच्या ऐन बहरात असतानाच करिश्मा आणि अभिषेक (Abhishek Bachchan) चे लग्न जमले होते. परंतु बबितामुळे ते लग्न होऊ शकले नसल्याचे कपूर खानदानात बोलले जाते. त्यानंतर करिश्माने २००३ मध्ये दिल्लीतील उद्योगपती संजय कपूर (Sanjay Kapoor) सोबत लग्न केले. करिश्माला समायरा (Samaira) आणि कियान (Kiaan) ही दोन मुलेही झाली. परंतु लवकरच या दोघांमध्ये वाद होऊ लागले आणि २०१४ मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. २०१६ मध्ये दोघांचा घटस्फोट मंजूर झाला. मात्र हा घटस्फोट संजय कपूरला खूपच महाग पडला होता. संजय कपूरने त्याचे खार येथील घर आणि मुलांच्या नावावर १० कोटी रुपयांचे बॉन्ड दिले होते. या बॉन्डमधून करिश्माला प्रत्येक महिन्याला १० लाख रुपये व्याज मिळत होते. याशिवाय करिश्माचे सगळे दागिने करिश्मालाच देण्यात आले होते.

आता संजय कपूरने या घटस्फोटाबाबत बोलताना म्हटले आहे, करिश्मा अत्यंत लालची असून तिने केवळ पैशांसाठी माझ्यासोबत लग्न केले होते. करिश्माला फक्त माझे पैसे दिसत होते. तिला मी नेहमी पैसे देत असे पण ती मी पैसे देत नसल्याचा आरोप करीत असे. घटस्फोटानंतर तिने प्रचंड रक्कम मागितली. तिच्यापासून सुटका व्हावी म्हणून मी तिची मागणी पूर्ण केली. करिश्मा कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर ने २०१७ मध्ये गर्लफ्रेंड प्रिया सचदेव (Priya Sachdev) सोबत लग्न केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER