…त्यामुळे मला नाईलाजाने सही करावी लागली; बाळासाहेबांच्या अटकेवर भुजबळांचे स्पष्टीकरण

मुंबई : शिवसेनाप्रमुख बा‌ळासाहेब ठाकरे यांना अटक करणे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची चूकच होती. फक्त काही वरिष्ठांच्या हट्टापायी ही कारवाई करण्यात आली, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेबांना झालेल्या अटकेवरून नवा राजकीय वाद सुरु झाला आहे . या प्रकरणावर तत्कालिन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे .

या प्रकरणावर छगन भुजबळ म्हणाले, “१९९९मध्ये प्रचार सुरू केला, तेव्हा आमच्या वचननाम्यात श्रीकृष्ण आयोगाने ज्या लोकांना दोषी ठरवले त्यांच्यावर योग्य कारवाई करू, असं म्हटलेलं होतं. त्यानंतर १९९५ मध्ये युतीचं सरकार आलं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांविरूद्ध असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यात आला होता. परंतु, श्रीकृष्ण आयोगाची फाईल तशीच होती. नंतर ती फाईल माझ्यासमोर आली तेव्हा मी गृहमंत्री होतो. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली होती. त्यामुळे मला नाईलाजाने सही करावी लागली. पण हा मुद्दा आता संपला आहे.”असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले .

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत . अजित पवारांच्या या वक्तव्यावरून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे . अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर ती चूक छगन भुजबळांची होती, असे नाव घेवून सांगावे. विभागाचे प्रमुखांची ती चूक होती, असे ते सांगत असले तरी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे त्यावेळी ती चूक करणार्‍यांचे बाप होते, हे विसरता येणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.