ईडब्ल्यूएसचे आरक्षण हा मराठा आरक्षण खटल्याचा खून; राजेंद्र कोंढरे यांचा संताप

Rajendra Kondhare

मुंबई :- राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे (EWS) आरक्षण देऊन केवळ स्वत:ची सोय पाहिली आहे. हा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षण खटल्याचा (Maratha Reservation) खून आहे, असा संताप मराठा समाजाचे नेते राजेंद्र कोंढरे (Rajendra Kondhare) यांनी व्यक्त केला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा समाजाला EWS चे आरक्षण दिले ते वाघ मारून ससा हातात देण्याचा प्रकार आहे. सरकारच्या या पावलाने मराठा आरक्षणाला नख लागले आहे. आता सगळ्या मराठा संघटना एकत्र येऊन पुढची रणनीती ठरवतील, असे कोंढरे म्हणालेत.

याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना राजेंद्र कोंढरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रवर्गांतर्गत आरक्षण नको, हे आम्ही महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि राज्य सरकारला स्पष्ट सांगितले होते. तरीही सरकारने हा निर्णय घेतला. राज्य सरकारने स्वत:च्या सोयीसाठी हा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रवर्गात आरक्षण देता येणार नाही, हे स्पष्ट केले होते. मराठा समाज एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला पात्र असताना आमचा समावेश ओबीसींमध्ये करायचा सोडून सरकारने ईडब्ल्यूएस प्रवर्गात आरक्षण देण्याचा सोपा मार्ग निवडला आहे, असे कोंढरे म्हणालेत.

सरकारची आकडेवारी चूक

सरकारने दिलेली आकडेवारी चूक आहे. मराठा समाजात गोंधळ निर्माण करून ईडब्ल्यूएस आरक्षण घेण्यास प्रवृत्त केले जात आहे. ९० टक्के महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीसंख्या नसल्याने EWC अंतर्गत आरक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळतो. केवळ मेट्रो शहरांमधील अभियांत्रिकी महाविद्यालयांपुरता प्रवेशाचा प्रश्न उद्भवतो, असे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या बाजूने की विरोधात? मेटेंचा काँग्रेसला प्रश्न

मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाल्यामुळे एरवी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी आता काँग्रेसकडे मोर्चा वळवला आहे. तुमचा पक्ष मराठा समाजाच्या बाजूने आहे की विरोधात, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, अशी मागणी मेटे यांनी केली.

ही बातमी पण वाचा : मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय ; मिळणार EWS चा लाभ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER