जळगावातही ‘सांगली पॅटर्न’, भाजपचे १५ नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला?

Eknath Khadse - Girish Mahajan

मुंबई : भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या समजल्या जाणाऱ्या जळगावमध्ये भाजपला धक्का देण्यासाठी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून सुरू झाल्या आहेत. नुकताच सांगली महापालिकेत झालेल्या महापौर निवडणुकीत वापरण्यात आलेल्या पॅटर्नची पुनरावृत्ती जळगाव महापालिकेत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेतील सत्ता भाजपच्या हातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे. ५७ सदस्य असलेल्या भाजपकडे महापौरपद आहे. मात्र येत्या दोन दिवसांत नव्या महापौरांची निवड होणार आहेत. यावेळी भाजपचे १५ नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. आणि हे नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या अनेक बंडखोर नगरसेवकांनी आज सकाळी मुंबई गाठली. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, सुरेश दादा जैन यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हे नगरसेवक सेनेच्या गोटात जाणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र आता या नगरसेवकांनी एकनाथ खडसे, सुरेश दादा जैन यांच्याशी भेट घेतल्यानंतर चित्र पालटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील ५ वर्षात जळगाव जिल्ह्यात तोडफोडीचे राजकारण करत भाजपच्या गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सत्ता आणली. मात्र आता त्यांच्या हाच डाव एकनाथ खडसे उलथवनार असल्याची शक्यता आहे.

भाजपला धक्का देण्यासाठी राजकारणातील कट्टर विरोधक असलेले एकनाथ खडसे आणि सुरेश जैन एकत्र येत असल्याचे हे संकेत आहेत. या दोन शक्ती एकत्र झाल्यास आगामी जिल्हापरिषद, महापालिका आणि भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी हे मोठं आव्हान ठरण्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपने महापालिका सत्ता मिळवली खरी, पण राज्यात भाजपला हातातील सत्ता गमवावी लागली. गेल्या वर्षभरात केंद्राचा पैसा वगळता कुठलाही निधी जळगाव महापालिकेला मिळाला नाही. अशा परिस्थितीत अनेक नगरसेवक बेचैन झाले. भाजपात राहून निधी मिळू शकत नसल्याने अनेक नगरसेवक सेना आणि राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याचं दिसत आहे.

अशातच सुरेश दादा जैन हे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. जर भाजप विरोधात एकनाथ खडसे आणि सुरेश जैन हे समीकरण जुळून आलं तर भाजपला आगामी जिल्हा परिषद, विधान परिषद निवडणूक सोपी ठरणार नाही. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER