एकेकाचा “कट ऑफ पॉईंट” !!!

Everyone's Cut off point

हाय फ्रेंड्स ! ह्या मनसंवाद या सदरामध्ये आपण अनेक प्रकारचे विषय हाताळत आहोत. चालू घडामोडी ,सामाजिक प्रश्न आणि त्याचा मानसशास्त्रीय भाग असो की आपल्या व्यक्तिगत विकासामध्ये ध्येयनिश्चिती, निर्णय कौशल्य, रागावर नियंत्रण असो त्याचप्रमाणे समाज हा आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग असतोच असतो .आपला स्वतःचा स्वतःशी संवाद हा देखील आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग असतोच असतो. आपण जेव्हा समाजात राहतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती अनेक नात्यांनी जोडून वावरत असतात. मग बॉस सासु-सासरे आई-वडील, जोडीदार, मित्रपरिवार, आपली मुलं, आपल्या ड्रायव्हर, आपल्या घरच्या मावशी अशांच्या संगतीतच आपला दिवस संपतो.

यांच्याशी संवाद साधताना आपला स्वतःचा स्वतःशी संवाद ,आत्मप्रतिष्ठा ,आत्मसन्मान हा महत्त्वाचा आहे. कारण त्याचे पडसाद इतर नात्यांवर नकळत पडतात .इतके नकळत की चुक कुणाचीच नसूनही संवादात अडचणी येतात. एका उंटाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल की त्याच्या पाठीवर भरपूर ओझं, सामान एकेक करून लादलं जात असतं. पूर्ण ताकदीनिशी ते सगळं पेललं जातं. दोन्ही बाजू समतोल होती अशी काळजी घेतली जाते. त्यामुळे उंट ते ओझ सहन करत जातो. पण एक वेळ अशी येते की शेवटी एक छोटीशी काठी रचली जाते आणि केवळ एका काठीने तो उंट खाली बसतो.

फ्रेंड्स ,अगदी असच व्यक्तीबाबत होत असतं. काही व्यक्ती या खुप सोशीक, त्यागी, समजूतदार शरणागती पत्करणारया अशा असतात. या सगळ्यांना खूप आवडतातही पण असं करत असताना त्यांनाही कुठेतरी जाणवत असत की लोक त्यांचा वापर करतात, गृहीत धरतात आणि एक दिवस अशा व्यक्ती मोडून पडतात ,ब्लास्ट होतात ,बर्न आऊट होतात .त्यांच्या सहनशीलतेचा कळस होतो. तो त्यांचा “कट ऑफ पॉईंट” आहे असं आपण म्हणू शकतो.

मग याला उपाय काय ? तर आपल्या आपल्या लक्ष्मण रेषा आखून घेणं. ज्याला boundaries असे म्हटले जाते. आपलं अस्तित्व, आपली ओळख, आपले मानसिक आरोग्य आणि सुदृढता राखण्यासाठी या खूप आवश्यक असतात. या दोन्ही प्रकारच्या असू शकतात शारीरिक आणि भावनिक, तसेच मानसिक आपल्यास सोयीनुसार त्या आखून घ्याव्यात .पण त्या असायला हव्यात हे नक्की !

या हेल्दी लक्ष्मण रेषा म्हणजे नेमकं काय ? किंवा नेमक्या कशा आखायच्या ? त्यातून आपली काळजी कशी घेता येते ? तर क्षेत्ररक्षक अशी लक्ष्मण रेषा म्हणजे तुम्ही आणि इतर लोक यांच्यात असणारी अशी एक मर्यादा किंवा जागा जिथून तुमच्या आयुष्याची सुरुवात असते आणि जिथे इतर लोकांचा प्रवेश निश्चितपणे संपतो. हे असं आखून घेणं आपल्या सुखशांतीसाठी आवश्यक असतं. ज्यांच्यामुळे तुम्ही ही मानसिक व भावनिक दृष्ट्या स्थिर बनता. म्हणजे कुणी माझा गैरफायदा घेतात आहे, ही मनातली रुखरुख उरत नाही. त्यामुळे सूड, राग ,बर्न आऊटला जागा उरत नाही. ताण, आर्थिक दडपण, नातेसंबंध यातील प्रश्न दूर होण्याला या मदत करतात.

या कशा असतात ?

  • व्यावसायिक दृष्टीने बघितले तर आपले काम चोख बजावल्या नंतर केवळ कोणाला खूष करण्यासाठी म्हणून ऑफिसमध्ये बसून राहणे आणि फाईल्स हाताळत राहणे थांबवणे, किंवा सुट्टीच्या दिवशी सुद्धा आलेले काम करून देणे, असे न करता आपल्या कामाच्या मर्यादा आखून घ्यायला हव्यात.
  • शाळेमध्ये शिक्षक आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही विद्यार्थ्यांना न सांगता आपली एक लक्ष्मणरेषा आखून वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवू शकतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सगळ्याच वागणुकीची ,हालचालींची, पैलूंची जवाबदारी टीचरची नसून ही त्यांची त्यांची आहे. हे सुरुवातीलाच पक्के करून घ्यायला हवे.
  • थेरपिस्ट आणि क्लायंट यांबाबत सुद्धा थेरपिस्ट ला आपले मानसिक स्वास्थ्य टिकवायचे असेल तर तो कुठल्याही सोशल मीडियामार्फत संपर्कात राहणार नाही याची व्यवस्थित सूचना द्यायला हवी. (सध्याचा पेंडामिक काळ अपवाद, कारण यात ऑनलाइन सेशन्स चालू ठेवावे लागतात आहे.)
  • मुले आणि पालक यांच्या बाबतीत सुद्धा बरेचदा आई बाबा बोलताना सगळ्याच गोष्टी शेअर करतीलच असं नाही.. ही मुलांसाठी मर्यादा असावी त्याचप्रमाणे मुलांची खोली आवरताना मुलांची डायरी समोर असूनही न वाचणे ही पालकांसाठी मर्यादा असावी.
  • घरात काम करणारी आई पत्नी-स्त्री कुठल्याही भूमिकेत आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असूनही एखादी गोष्ट करणे शक्य नसेल आवडत नसेल इच्छा नसेल तर ते ती न करण्याची तेवढी मर्यादा आखून घेऊ शकते. नम्रपणे हे मला जमणार नाही हे ते सांगू शकते.
  • आजकाल लग्न झालेल्या मुली नव्या घरी गेल्यानंतर या आपल्या बॉण्ड्रीज आखतात. जी गोष्ट आपण करू शकणारच नाही ती स्पष्टपणे सांगून टाकतात. फक्त या बाउंड्रीज आखताना “असरटिवेनेस “बाळगायला हवा. म्हणजे आपली मर्यादा सांगताना अतिशय नम्रपणे , दुसऱ्याला अपमानित न करता सांगता यायला हव्यात ! समोरचा माणूस किंवा व्यक्ती किंचित दुखावली जाऊ शकते पण अपमानीत व्हायला नको.
  • त्याच बरोबर या मर्यादा आखताना केवळ आपल्याला त्रास होऊ नये म्हणून प्रचंड प्रमाणात या लक्ष्मण रेषा आखणे म्हणजे दुसऱ्याच्या लक्ष्मण रेषेमध्ये प्रवेश करण्यासारखे असते हे लक्षात घेऊनच आपल्या लक्ष्मण रेषा आखायला हव्यात. म्हणजे ह्या केवळ आपल्या मनात स्वास्थ्यासाठी आहे, मनमौजीपणासाठी नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तसा समतोल राखायला पाहिजे. आपल्या लक्ष्मण रेषांचा अतिरेक, समोरच्या माणसाचे मनस्वास्थ घालवतो आहे का ? याकडे ही दृष्टीक्षेप टाकायला हवा.

अर्थात बाउंड्रीज , लक्ष्मण रेषा आखणे यामुळे अगदी” कट ऑफ पॉइंटला” पोहोचून उन्मळून पडण्याची वेळ येणार नाही.

ह्या बातम्या पण वाचा : 

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button