चीनच्या संकटातून सर्वांनीच धडा घ्यायला हवा…

Everyone should learn from China's crisis ...

Shailendra Paranjapeसरहद्दीवर चीननं केलेली आगळीक, केंद्र सरकारच्या सत्ताकेंद्रांकडून आलेली परस्परविसंगत विधानं, प्रमुख विरोधी कॉँग्रेस पक्षाच्या राहूल गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी उपस्थित केलेल प्रश्न आणि डाव्या पक्षांची परंपरागत भूमिका, या सगळ्यातून चीनच्या कृतीनं एकाच वेळी अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तसंच दीर्घकालीन दोरणाधारित निर्णय घ्यावे लागतील, हे उघड आहे. चीनशी सीमेसंदर्भातल्या कुरबुरी नवीन नाहीत पण देश आणि जग करोनाशी लढत असताना, अर्थव्यवस्थेपुढं प्रश्नचिन्ह असताना हे ड्रँगनचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण केलेल्या प्रतिमेसमोरचं आणि देशासमोरचंही कसोटी पाहणारं आव्हान आहे, यात शंका नाही.

युद्ध हा सर्वात शेवटचा पर्यांय असतो आणि सारे राजनैतिक, मुत्सद्देगिरीचे पर्याय निष्फळ ठरले तरच युद्धाचा पर्याय उरतो, हे लक्षात घ्यायला हवं. चीननं सीमेवर केलेली आगळीक हे फुल स्केल वॉर नव्हे, ते तसं होऊ नये, हेही महत्त्वाचं आहे. चीनची लष्करी आर्थिक ताकद लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव आणणं, त्याबरोबरच आपण हे खपवून घेणार नाही, हा संदेश कठोरपणे चीनपर्यंत पोहोचेल, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

परराष्ट्र मंत्रायलयानं चीननं मागं जाव, असं केलेलं विधान, पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेलं आणि पंतप्रधानांचं वक्तव्य म्हणून वृत्तपत्रातून आलेलं आपल्या भूमीवर एक इंचही कोणी घुसलेलं नाही, हे विधान परस्परविसंगत किंवा किमान एकाच अर्थाचं नक्कीच नव्हतं. त्यामुळं त्यावर टीका झाली आणि त्याचे अर्थही विविध प्रकारे लावले गेले. नेहमीप्रमाणं सरकारच्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूनं आणि मोदींच्या विरोधातलं मतप्रदर्शन केलं गेलं. काहींनी नेहमीप्रमाणं झटपट निष्कर्ष काढून पंतप्रधानांना कसं आंतरराष्ट्रीय राजकारणातलं कळत नाही, इथपर्यंत मजल मारली.

पंतप्रधानांनी निमंत्रित केलेली सर्वपक्षीय बैठक, त्यातून राष्ट्रीय पातळीवर सर्व पक्ष या संकटकाळात एकदिलानं काम करतील, हे चित्र निर्माण झालं. मात्र, चीनकडून घुसखोरी झाली तर लगचेच लष्करी प्रत्युत्तर का दिलं गेलं नाही, लष्करी कारवाई करण्यापेक्षा मुत्सद्देगिरी वा राजनैतिक पातळीवर सध्याचं सरकार कमी पडलं का, अशी चर्चाही काही तज्ज्ञ करू लागलेत. काहींना सोशल मिडियातून येत असलेल्या रंजक, करमणूकप्रधान माहितीमुळं गोंधळ उडतोय, असं वाटतंय. काहींना सोशल मिडियातूनच काय ते खरं समजतं असंही वाटतंय.

त्यामुळं यातल्या बहुतांश घटकांकडून आपापल्या सोयीचं सत्य निवडायची प्रक्रिया जी एरवीही बघायला मिळते, तीच होताना दिसतेय. असं असेल तर मग खरं काय किंवा खोटं काय, हा प्रश्न उरतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न ज्यावर अशा घटनांनंतर संसदेतही चर्चा होते, ती म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड झालीय का…दुसरा मुद्दा म्हणजे आज करोनाचं आणि त्याच्या परिणामस्वरूप समोर ठाकलेल्या आर्थिक संकटाच्या वेळी लष्करी कारवाई किवा युद्धाचे ढग परवडणारे आहेत का…

चीननं आगळीक करताना नेपाळकडून उपद्रव सुरू होतो…पाकिस्तानकडूनही हालचाली सुरू होतात, हे अपघात नक्कीच नसतात. त्याबरोबरच चीनकडून एकाच वेळी भारताशी कुरापतखोरी करतानाच जपानशीही संघर्षाची भूमिका घेतली जाते, हाही योगायोग नसतो. त्यामुळं, अशा कोणत्याही परिस्थितीत हजारो किलोमीटरवरून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतून येऊन भारतासाठी संरक्षक कवच म्हणून उभे राहतील, ही अपेक्षा बाळगणं फारसं हितकारक नाही. त्यामुळं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार किंवा दुसऱ्या भाषेत आत्मनिर्भर म्हणजे काय आणि तसं होण्याचा उपयोग काय, याची चुणूकच चीननं केलेल्या आगळीकीमुळं दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरची युद्धखोरी न करणारं राष्ट्र ही प्रतिमा, पंतप्रधान नरेन्द्र मोदींचे आखाती देशांसह, इस्रायल, अमेरिकेसह युरोपशी असलेले संबंध सध्याच्या चीन संघर्षकाळात महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळं एकही इंच कोणी आपल्या हद्दीत घुसलेले नाही, हे वाक्य, विरोधी पक्षांनी विचारलेला घुसखोरी झाली नाही तर मग चीनला मागं जायला का सांगताय, हा प्रश्न आणि माध्यमातून आलेलं तिसरं सत्य, हे सारे सत्याचे अंश असतील का आणि आपापल्या पातळीवरची सत्य असतील का, हे संसदेत आणि भविष्यात समोर येईलच, पण ते येईपर्यंत युद्ध परवडणारं नाही, हे चीनलाही समजतं, तसं आपल्या सरकारलाही समजतंय. त्यामुळं दीर्घकालीन विचार करून निर्णय घेणं श्रेयस्कर असतं. तात्कालिक, भावनिक किंवा घाईघाईचे निर्णय दीर्घकालीन विपरित परिणामांना कारणीभूत होऊ शकतात. त्यामुळं करोनासह अशा सीमेवरच्या संकटाच्या वेळीही संकुचित राजकारणाला तिलांजली देणं आणि व्यापक देशहित लक्षात घेऊन राजकीय आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम करणारे निर्णय घेण्यासाठी वाव देणारं वातावरण देशात निर्माण होणं, हेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER