आता शरद पवारांसह विरोधक बेकार झालेत : उद्धव ठाकरे

uddhav thackeray-Sharad Pawar

नगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत . शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यसह विरोधकांवर निशाणा साधला .

ही बातमी पण वाचा:- निवडणुकीनंतर पवारांचा पक्षच संपूर्ण रिकामा होईल – मुख्यमंत्री

स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण देणार असल्याचे विरोधक सांगत आहेत. मात्र, स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची मागणी सर्वप्रथम आम्हीच केली होती. आताही बेकारांना संधी आम्ही देणार याच्यासाठी आम्ही काम करतोय. मात्र, आता शरद पवारांसह विरोधक बेकार झाले आहेत. त्यामुळे त्यांना बेकारी काय असते हे आता कळले आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे .

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात संगमनेर मतदारसंघामधून शिवसेनेने साहेबराव नवले यांना मैदानात उतरवले आहे. दरम्यान, नवले यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज संगमनेर येथे झाली.यावेळी ते बोलत होते .

आमच्याकडे आता सगळं हाऊसफुल झालंय सर्व चांगले लोक आमच्याकडे आलेत. धगधगते निखारे आज आमच्यासोबत आले आहेत त्यामुळे तुमचा विस्तवं पेटतोय का ते बघा. जे काही तुमचे पाच दहा निवडून येतील ते तरी आमचं सरकार आल्यानंतर तुमच्यात राहतील का? याचा विचार करा, असं होणार असेल तर मग कशाला त्यांना मतं द्यायची. ही तुमच्या भविष्याची निवडणूक आहे त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी संगमनेरच्या जनतेला केले.

दरम्यान आपण खासदार सुजय विखेंना मोलाचा सल्ला दिल्याचेही ते म्हणाले . ‘सुजयशी बोलताना मी म्हटलं. सुजय तू न्युरोसर्जन आहे, आपल्याकडे तर न्युरोसर्जन पाहिजेच. राजकारण म्हटलं की म्हणतात मेंदूची गरज नसते. पण, आपल्याकडेसुद्धा बुद्धीवान माणसं पाहिजेच. . कारण, ज्यांची बुद्धी बिघडते त्यांचं थोडं ऑपरेशन करावच लागतं.

म्हणून, तू प्रॅक्टीस सोडू नकोस, अभ्यास सोडू नकोस, असा सल्ला मी सुजयला दिल्याचे उद्धव ठाकरेंनी संगमनेर येथील सभेत सांगितले.तसेच विरोधीपक्ष नेते असतानाही सरकारच्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही युतीच्या परिवारात आलात याला धाडस लागतं, यासाठी राधाकृष्ण विखे-पाटलांना मी धन्यवाद देतो, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते.