नित नवा दिस जागृतीचा…

Everyday new awakening.

तुकाराम महाराजांनी (Tukaram Maharaj) म्हटले की, आयुष्यातला प्रत्येक दिवस हा जागृतीचा असावा. पण त्यांची जागृतीची कल्पना ही, तुम्हा-आम्हासारखी केवळ जागेपण, म्हणजे झोपेतून जागे होणे हे अपेक्षित असेल तुकारामांना? नक्कीच नाही. आणि म्हणूनच मला परत आठवण आली की हा ऑक्टोबर महिना, जागतिक मानसिक आरोग्य जनजागृती महिना म्हणून संपन्न होतोय. परंतु तुकारामांच्या वरील उक्तीप्रमाणे फक्त एखादा महिना किंवा चातुर्मासात काहीतरी नवीन करणे किंवा ठरवणे असा अर्थ घेणे योग्य नाही .म्हणूनच मानसिक आरोग्यासंबंधीची ही जागृती कायमस्वरूपी चालू राहणारी प्रक्रिया असायला हवी .

मागे काही लेखांमधून, तणावमुक्तीसाठी किंवा मानसिक आरोग्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या- असा मी उल्लेख केला होता. विनाशर्त स्वीकार स्वतःचा, इतर व्यक्तींचा आणि परिस्थितीचासुद्धा ! त्यासाठी तडजोड आणि स्वीकार यातला फरकही बघितला होता. स्वीकार हा मनापासून असतो तर तडजोड ही मारून मुटकून केले गेलेली गोष्ट!

त्यावेळी मला एक-दोन जणांनी विचारलं होतं की, “हे सगळं समजतं हो; पण करायला किती कठीण आहे बरं ! नेहमी असा प्रश्न पडतो ती नेहमी समजूतदारपणा ,माघार मीच घ्यायची का ? समोरच्या माणसानेही बदलायला हवेच ना ? आणि हे सगळं करताना आपल्याला स्वतःला कितीही त्रास होत असतो.” असा काहीसा त्यांचा सूर होता. आणि खरी होती त्यांची ही तक्रार !

मीही त्याच्यावर खूप विचार केला. चिंतन केलं. सांगायला खूप सोपी असलेली ही गोष्ट अमलात आणण्यासाठी तेवढीच कठीण आहे. कुणी डॉक्टर असला की त्याला ताप येत नाही असं नाही आणि कंपनीचा मालक असला तरी त्याला कधी मशीनवर उभं राहावंच लागत नाही असंही नाही. मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि आयुष्यातले प्रश्नच चुटकीसरशी सगळे संपले, असं होत नाहीच. आता आपला नेमका प्रश्न कुठे उत्पन्न होतो हे ओळखता येऊ शकतं. केवळ उत्तर मिळून उपयोग नसतो, तर त्याचा वापर करणं महत्त्वाचं असतं. या गोष्टींमधून, अशा प्रयोगातून मिळालेला अनुभव दृष्टिकोन व्यापक करण्यास उपयोगी ठरतो.

तसे म्हणाल तर “कर्मण्येवाधिकारस्ते महा फलेषु कदाचन” फळाची अपेक्षा न करता काम करणे, अपेक्षांचा त्याग, मीपणाला फाटा हे तर अध्यात्म सांगतं. कुठलंही काम श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही साधणारं असावं म्हणजे ते वाखाणण्यासारखे आणि योग्य मार्गानेही केलेले असावे.

# मग याची सुरुवात होते ती, स्वतःचा विनाशर्त स्वीकार करण्यापासून. यात अडचण येते कुठे कुठे ?

१) मनात आत्मसन्मान नसेल, स्वतःबद्दल न्यूनत्वाची भावना असेल, स्वतःला प्रूव्ह करायचे असेल.

२) बरेच लोक परफेक्शनिस्ट असतात .सगळ्याच गोष्टी मला याव्या आणि तितक्याच उत्तम रीतीने व्हाव्यात हा त्यांचा अट्टहास असतो, वृत्तीचं समाधान नसतं . स्वतःच्या अविवेकी धारणा असतात . प्रत्येक बाबतीतला ‘च’ हा अडचणीत आणत
असतो.

३) काहींची वृत्ती ही people-pleasing बिहेवियर( वर्तन )असणारी असते. इतरांनी मला चांगलं म्हणावं, सगळे माझ्यावर खूशच असले पाहिजे एवढे एकच ध्येय घेऊन त्या सगळ्या गोष्टी करतात.

४) स्वतःच्या मर्यादा न जाणणे . मीपण एक मनुष्यप्राणी आहे आणि मलाही काही मर्यादा आहेत याचं भान न राहिल्यानं त्या व्यक्ती या गोष्टींसाठी धडपडत असतात. आणि स्वतःची ओढाताण करून घेतात.

५) खरं तर मुळात आदर्श या संकल्पनेलाच खूप वास्तवतेचा आधार नाही . ही व्यक्तिपरत्वे वेगळी असणारी कल्पना . म्हणूनच आदर्शविषयक विचार करताना वास्तवतेच्या अंगाने ‘स्व’ची ओळख करून आपल्या क्वालिटी आणि न्यूनत्व यांचे प्रमाणित विश्लेषण करावे. जे आपल्याकडे नाही त्यावर विचार करण्याऐवजी जे आहे ते खुलवणं यावर भर द्यावा.

६) समोरच्याचा एखादा चांगला गुण माझ्या आयुष्यासाठी उपकारक होऊ शकतो असं जाणवलं तो एक घेऊन त्यावर नक्की काम करावं. परंतु काही गुण असे असतात, की ज्याने आयुष्यात फारसा परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, गाणं माझं वैशिष्ट्य असेल, नृत्य समोरच्या व्यक्तीचं. मग नृत्य शिकण्याचा अट्टहास निरर्थक ! ऑफ कोर्स स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी तुम्ही ते करू शकता. त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी नाही.

*त्यामुळे दुसऱ्याशी सतत तुलना, मत्सर, बरोबरी आणि स्वतःला कमी लेखणे यापासून दूर राहता येईल .*

१) कोणीच परिपूर्ण नसतो, हा विचार विनाशर्त स्वतःचा आणि इतरांचा स्वीकार यांना जोडणारा दुवा आहे . बरेचदा काही जणांना एक सवय असते की, समोरच्याचे फक्त दोष बघायचे, नावे ठेवायची, गॉसिपिंग करायचे. पण काही व्यक्ती अशाही भेटतात की सहवासातील कुणाच्याच दुर्गुणांचा उल्लेख न करता फक्त गुणांवर, चांगल्या कृतींवर फोकस करतात. हीच इतरांचा विनाशर्त स्वीकार करण्याची गुरुकिल्ली आहे असं म्हणता येईल. समोरच्याच्या फक्त चांगल्या गुणांबद्दलच सतत बोलल्याने आपोआपच चांगली भावना निर्माण होऊन संबंध सुधारतात.

२) दुसरी महत्त्वाची गोष्ट ‘मी’च्या कोशातून बाहेर येणे. मी म्हणजे कुणीतरी महान ! मीच माघार का घ्यायची ? अरे बाबा! एवढ्या मोठ्या पृथ्वीवर तू एवढासा अंश आहे. अतिशय क्षुल्लक ! नगण्य ! तरीही मीबद्दलचा अहंकार सुटत नाही. ‘मी’पण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो, जीवन त्यांना कळले हो ! या ओळीप्रमाणे ज्यांचे मीपण गळून पडले आहे ते खऱ्या अर्थाने मॅच्युअर्ड होतात.

कालच्या लेखात आपण बोललो की, आपला देश अनेक संस्कृतींचा , विविधतेचा संगम आहे आणि तरीही त्यांच्यात एक युनिटी, एकता दिसून येते. विविधतेतील एकता जर आपण सभोवतीच्या व्यक्ती आणि परिस्थितीबाबत बाळगली तर ? एखाद्या प्रिझममधून एकच पांढरा किरण गेल्यानंतर तो परावर्तित होतो आणि त्याचे सप्तरंगात रूपांतर होते. ते सप्तरंग खूप मोहविणारे असतात. सप्तरंगातील प्रत्येक रंगाचं सौंदर्य वेगळंच! या सप्तरंगाच्या एकत्र येण्याने, येणारा पांढरा रंगही तितकाच पवित्र, निर्मळतेचं आणि प्रसन्नतेचं प्रतीक ! पाच बोटं मिळून मूठ बनत असली तरी मूठ जितकी महत्त्वाची तितकीच पाच बोटंही महत्त्वाचीच. थोडक्यात काय तर विविधतेची जशी वैशिष्ट्ये तशीच एकतेचीपण.

त्याचप्रमाणे आपल्या सभोवतालची सगळी माणसं ,व्यक्ती वेगवेगळ्या असून त्यांना जशी आपली आपली वैशिष्ट्ये असतात ,स्वतःचे काही गुणदोष असतात. प्रत्येकच व्यक्तीत दोष असतात जसे आपल्यातही असतात, पण सगळ्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांनी प्रत्येक गोष्टीला त्यांचा स्वतःचा एक असा ‘स्पेशल टच’ मिळतो. त्याचं व्हॅल्युएशन, चांगले-वाईटपणा ठरवता नाही येत. एखाद्या कार्यक्रमाची शोभा कशी वाढू शकते याचं प्रत्यंतर देणारा एक प्रसंग ! ज्यामध्ये दोन्ही व्यक्तींच्या ठिकाणची सर्जनशीलता, आपुलकी , पूर्ण लक्ष असणं हे कसं असू शकतं आणि त्याचे मार्ग कसे भिन्न असू शकतात याचं एक उदाहरण म्हणजे माझ्या सासू-सासऱ्यांचा एकाच महिन्यात वाढदिवस झाला.

सासरे ८० वर्षांचे आणि सासूबाई ७५ वर्षांच्या झाल्यात. मी दैनंदिन लिखाण करत असताना मला त्यांच्यावर लेख स्फुरला. मला भावलेल्या त्यांच्या गुणांचा, सवयींचा त्यात ओघवता परिचय होता. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता होती .कारण मला लिहायला आवडतं आणि जमतं. माझ्या जावेने वाढदिवस त्यांना आगळेवेगळे गिफ्ट देऊन वाढदिवस केला. त्यांना लागणाऱ्या एवढ्या बारीक-बारीक गोष्टींचे बॉक्स तिने बनवले होते. म्हणजे पायमोजे, कोल्ड क्रीम ,नेलकटर ,टॉर्च, सासूबाईंसाठी विविध मसाले , सुपारी ,बाम, विविध तेल ,मोहरी ,बदाम, ऑलिव्ह ऑइल, एवढेच काय त्यांचा आवडता दागिना पूर्वी तोरड्या होत्या, ते आठवून फक्त एक टोकन म्हणून तोरड्या . असाच दीड-दोनशे वस्तूंचा संच तिने आठवणीने त्यांच्या गरजा बघत-बघत एकत्र करून त्यांना दिला. मुळात तिला स्वतःला खरेदीची आवड आहे आणि जाणही आहे.

सुयोग्य दृष्टी आहे. तिच्यातील वैशिष्ट्यांचा तिने वापर केला. तर पुतणीने सुंदर सँडविचेस बनवून डेकोरेशनची जबाबदारी घेतली; कारण तो तिचा आवडता प्रांत !यासगळ्यातून एकत्रित एकच भावना जाणवत होती- ती म्हणजे त्या दोघांबद्दलची आपुलकी, त्यांच्या जीवनशैलीविषयी संपूर्ण निरीक्षण , त्यांच्या गरजांची जाणीव. अशी ही विविधतेतून एकत्र अशी साधलेली पवित्र आणि शुद्ध अशी भावना होती.

प्रत्येकाने आपापली वैशिष्ट्यं जपत साधलेली एकत्र अशी एक उन्नत कृती ! स्वतःतील ‘स्व’चा मान ठेवत आणि दुसऱ्याच्या गुणांची जाण ठेवतही उत्तम ‘आउटपुट’ मिळते. आणि इथे तुलना संपते, मत्सर लयाला गेलेला असतो. असं म्हणतात की समान रुची असणाऱ्यांचं जास्त जमतं. Obviously ! पण मी म्हणेन विविध आवडी एकत्र येतात तेव्हा वातावरण सजतं ! बहरत !! आणि हा असतो, unconditional acceptance of self ,others & situation !!!

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER