प्रत्येक प्रयोग होणार हाऊसफुल

Shubhangi Sadavarte

संत तुकारामांनी त्यांच्या एका अभंगांमध्ये असे सांगितले आहे की शेतकर्‍याच्या घरात कुणाचंही निधन झालं आणि बाहेर पावसाची सर आली तर पार्थिवाला अग्नी देण्यापूर्वी त्याला शेतात पेरणी करणं गरजेचं असतं आणि शेतकरी काळजावर दगड ठेवून त्याच्या कर्तव्याला प्राधान्य देत असतो. अभिनेत्री शुभांगी सदावर्ते (Shubhangi Sadavarte) हिने दोन दिवसापूर्वी देव बाभळी नाटकाचा प्रयोग केला. तो प्रयोग पाहताना या नाटकाच्या टीमच्या मनात तुकारामांचा हा अभंग पुन्हा पुन्हा आळवला जात होता. वडिलांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी शुभांगी ‘देव बाभळी’ चा प्रयोग करण्यासाठी नाशिकहून डोंबिवलीला पोहोचली आणि तिने तो प्रयोग केला.

कलाकारांसमोर अनेकदा द शो मस्ट गो ऑन असे वाक्य नाटकात, मालिकेत, सिनेमात संवाद म्हणून म्हणावं लागतं पण त्यापलीकडे कलाकारांना अनेकदा हे वाक्य जगावंही लागतं. शुभांगी सदावर्ते हिच्यासाठी खरोखरच देव बाभळीचा तो प्रयोग शो मस्ट गो ऑन हे शब्द जगायला लावणारा होता.

संगीत देवबाभळी या नाटकामुळे प्रवाहाविरोधात रंगभूमीवर काहीतरी वेगळा प्रयोग करणाऱ्या रंगकर्मींच्या पंक्तीत शुभांगी सदावर्ते हे नाव आवर्जून घेतले जाते. एक वेगळ्या धाटणीचं नाटक शुभांगीने तिच्या अभिनयाने उत्तमरित्या पेललं आणि तिने तिचा चाहतावर्ग निर्माण केला. सावित्री ज्योती या मालिकेतली आवलीच्या भूमिकेत छोट्या पडद्यावर दिसलेली शुभांगी सदावर्ते ही खरंतर रंगभूमीवरची अभिनेत्री आहे. नाटकातूनच तिच्या अभिनयाला सुरुवात झाली.त्यानंतर ती काही सिनेमा आणि मालिकांमध्ये दिसली परंतु रंगभूमी हा तिचा श्वास आहे. संगीत देवबाभळी नाटक प्रेक्षकांच्या मनामनापर्यंत पोहोचवण्यात शुभांगीच्या अभिनयाचा खूप मोठा वाटा आहे. अर्थातच शुभांगीच्या वडिलांनाही शुभांगीचा अभिमान वाटत आला आहे. ते तिला नेहमी म्हणायचे , मळलेल्या वाटेने सगळेजण जातात पण विषयापासून मांडणीपर्यंत नेहमी नवीन शोधणाऱ्या तुझ्यासारख्या अभिनेत्रीचा वडील असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. या नाटकासाठी तू जेव्हा मंचावर येतेस तेव्हा तुझे एक वेगळेच रूप पाहायला मिळतं. हे नाटक बघून खूप दिवस झाले पण पुन्हा एकदा तुझे नाटक बघायचं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शुभांगीचे वडील खूप आजारी होते. त्यानंतर पाच दिवसांपूर्वी शुभांगीच्या वडिलांचं निधन झालं. शुभांगी नाशिकची असल्याने नाशिकच्या राहत्या घरीच वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. शुभांगी आणि तिच्या वडिलांचा खूप मैत्रत्वाचं नातं होतं. ते दोघे नेहमी शुभांगीच्या नाटकांविषयी, तिच्या मालिकाविषयी चर्चा करायचे.

शुभांगी सांगते, एकदा ते म्हणाले होते की माझं काही बरंवाईट झालं आणि नाटकाचा प्रयोग लागलेला असेल तर तो प्रयोग चुकवायचा नाही. तुझ्या नसण्याने त्या प्रयोगाशी जोडलेल्या कितीतरी लोकांचे नुकसान करण्याचा अधिकार तुला नाही आणि नेहमीच कलाकार म्हणून तुझं पहिलं प्राधान्य हे तुझ्या कामाला आणि विशेषतः ज्यांना आधी शब्द दिला आहेस त्या शब्दाला असले पाहिजे. माझे वडील गेले तेव्हा शुक्रवार होता आणि शनिवारी म्हणजेच दुसऱ्याच दिवशी डोंबिवलीमध्ये देव बाभळी या नाटकाचा प्रयोग नियोजित होता. लॉकडाऊनमुळे काम नसलेल्या अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते आणि आता थोडं नॉर्मल पदावर येत असताना हा प्रयोग असल्यामुळे प्रत्येकालाच वेगळी उत्सुकता होती. प्रत्येकालाच प्रयोगाबद्दल आशा आणि आत्मीयता होती. त्यामुळे बाबांचे शब्द मला आठवले आणि शनिवारी मी नाशिकहुन डोंबिवलीला पोहोचले. त्याठिकाणी प्रयोग केला. मला बाबा म्हणाले होते की हे नाटक मला पुन्हा एकदा बघायचं आहे आणि मी जरा बरा झालो की या नाटकाच्या प्रयोगासाठी येईन. मात्र ते शक्य केलं नाही. पण जेव्हा मी बाबांच्या जाण्यानंतर डोंबिवलीमधल्या पहिल्या प्रयोगाला उभी राहिले आणि जेव्हा मी सभागृहाकडे पाहिलं तेव्हा मला असे वाटले की त्यांच्या इच्छेप्रमाणे बाबा नाटक बघत असतील. इतकंच नव्हे तर इथून पुढे हा प्रयोग करेन त्या त्या प्रयोगाला माझे बाबा नाट्यगृहात असतील असा मला विश्वास वाटतो. नाट्यगृहातील एखादी खुर्ची रिकामी असेल त्या खुर्चीवर माझे बाबा बसलेले असतील आणि म्हणूनच या नाटकाचा प्रत्येक प्रयोग माझ्यासाठी हाऊसफुल्ल असेल.

शुभांगी ही अभिनेत्री म्हणून आपल्याला परिचित आहेच पण ती एक चांगली गायिकादेखील आहे. आजपर्यंत तिने अनेक वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायलेली आहेत. नाट्य अभिनेत्री म्हणून शुभांगीने वडिलांच्या निधनानंतर दाखवलेले जे कर्तव्य आहे ते खरेच एखाद्या कलाकारासाठी खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही मुलीसाठी तिच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपणं ही तिच्या आयुष्यातली खूप मोठी पोकळी असते. पण वडिलांनी सांगितले शब्द, त्यांनी दिलेला सल्ला त्यांच्या जाण्यानंतर आपल्या कर्तव्यातून निभावणं ही मुलीची जबाबदारी असते आणि शुभांगीने तिची जबाबदारी पूर्ण करत वडिलांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER