एव्हरेस्टची उंची ८६ सेंमीने वाढली! नव्याने केलेल्या माजमामाचा निष्कर्ष

kathmandu mount everest

काठमांडू : एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच पर्वत शिखराच्या उंचीचे ८८४८.८६ मीटर असे नवे मोजमाप नेपाळ व चीन यांनी मंगळवारी संयुक्तपणे जाहीर केले. नेपाळ सरकारने नव्याने केलेल्या मोजमापात एव्हरेस्ट या हिमालयातील शिखराची उंची ८८४८.८६ मीटर एवढी असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली यांनी जाहीर केले. नेपाळने एव्हरेस्टचे हे नवे मोजमाप चीनच्या मदतीने केले होते.

भारतीय सर्वेक्षण विभागाने (Survey of India) सन १९५४ मध्ये एव्हरेस्टची उंची मोजून ती ८८४८ मीटर एवढी असल्याचे ठरविले होते. तेव्हापासून एव्हरेस्टची हिच उंची ग्राहय् मानली जात आली आहे. आता केलेल्या नव्या मोजमापात ही उंची ८६ सेंमी जास्त (सुमारे तीन फूट) भरली आहे.

नेपाळने एव्हरेस्टची उंची नव्याने मोजण्याचे नेमके का ठरविले हे जाहीर केले नाही. पण सन २०१५ मध्ये तेथे झालेल्या विनाशकारी भूकंपासह अन्य नैसर्गिक कारणांनी कदाचित एव्हरेस्टची उंची कमी-जास्त झालेली असू शकते, अशी अटकळ गेली काही वर्षे लावली जात होती.

यापूर्वी एव्हरेस्टच्या उंचीबद्दल नेपाळ व चीन यांच्यातही एकवाक्यता नव्हती. ‘सिन्हुआ’ या चीनच्या वृत्तसंस्थेनुसार १९७५ मध्ये चीनने मोजमाप करून एव्हरेस्टची उंची  ८८४८.१३ मीटर असल्याचे ठरविले होते. आता जाहीर करण्यात आलेली उंची त्याहूनही जास्त आहे.

सन २००५ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात एव्हरेस्ट शिखराखालच्या कातळाची उंची ८८४४.४३ मीटर असल्याचे व त्यावर ३.५ मीटरचा बर्फाचा थर असल्याचे आढळले होते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER