अखेर रेल्वेने ‘त्या’ सोळा जणांचे मृतदेह त्यांच्या राज्यात पाठवले

Dead Body - Aurangabad Railway Accident Video

औरंगाबाद : चालत का होईना पण त्यांना घरी पोहोचायचे होते मात्र नियतीच्या मनात दुसरेच काही होते. १६ मजुरांच्या कुटुंबीयांवर आता त्यांचे मृतदेह पाहाण्याची वेळ आली आहे. करमाडजवळ झालेल्या अपघातात ज्या १६ मजुरांना रेल्वेने चिरडले, त्या मजुरांचे मृतदेह रात्री रेल्वेनेच त्यांच्या गावाकडे रवाना झालेे. शुक्रवारी रेल्वे स्टेशनचा परिसर सुन्न झाला होता. ज्यावेळी रुग्णवाहिका या मृतदेह घेऊन आल्या त्यावेळी साऱ्यांचेच डोळे पाणावले. इंजिनमागे असलेल्या डब्यामध्ये हे सोळा मृतदेह ठेवण्यात आले आहेत.यातील सहा मृतदेह चांगल्या अवस्थेत होते तर इतर १० मृतदेह मात्र रेल्वे खाली आल्यामुळे अक्षरशः छिन्नविछिन्न झाले होते. मध्यप्रदेशातून आलेल्या पथकाने जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर हे मृतदेह या विशेष रेल्वेने पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची उपस्थिती होती. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघाती मृत्यूचा तपास करताना ज्या बाबी समोर येतील त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी माहिती मोक्षदा पाटील यांनी दिली.

राज्यात अनेक मजुरांनी आपले गाव जवळ करण्यासाठी शक्य होईल ते प्रयत्न केले. कोणी परवानगी मागितली कोणी पायी तर कोणी सायकलवर, काही जणांनी टँकमधून प्रवास करत आपल्या राज्यात जाण्याचा मार्ग निवडला. असाच काहीसा प्रयत्न जालना जिल्ह्यात स्टील कंपनीत काम करणाऱ्या 20 मजुरांनी स्वीकारला. मात्र काळाने घाला घातला आणि या मजुरांचे नुसते शरीर पोहचले, आत्मा मात्र रेल्वे रुळावरच सुटला.

मध्यप्रदेशच्या अडकलेल्या मजुरांना परत पाठवण्यासाठी औरंगाबादमधून विशेष रेल्वे सोडण्यात आली. रविवारी 1200 लोक आपल्या राज्यात परत गेले असताना शुक्रवारी परत 1200 लोक आपल्या घरी परत जाणार होते. त्यामुळे अनेक मजुरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. याच दरम्यान, लॉकडाऊनच्या काळातील देशातील सर्वात मोठी दुर्दैवी घटना औरंगाबादच्या करमाड जवळ घडली. जालन्यातील स्टील कंपनीत काम करणारे मजूर रेल्वे रुळावरून पायी जात असताना त्यांनी घेतलेली क्षणभर विश्रांती 16 कुटुंबाला उद्धवस्त करून गेली. जालन्याहून 45 किलोमीटर पायी चालत आल्यावर थकलेले मजूर रेल्वे रुळावर झोपले ते कायमचे. सकाळी पाचच्या सुमारास रेल्वे मालगाडीच्या धडकेत 16 मजूर जागीच ठार झाले. रेल्वे रुळावर शरीराचे तुकडे विखुरले गेले. पडलेले शरीराचे अवयव कोणते कोणाचे हे देखील ओळखणे अवघड झाले होते.