अखेर महापोर्टल बंद; महाआघाडी सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई  :- राज्यातील महाआघाडीच्या सरकारने फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयला दणका दिला आहे. ब आणि क गटांच्या पदभरतीची परीक्षा घेण्यात येणारे महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय  जारी करण्यात आला आहे. आता या गटाच्या परीक्षा घेण्यासाठी सेवा देणा-या संस्थांची सूची तयार करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढील परीक्षा या नव्या संस्थेमार्फत राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये सावंत आणि वायकर यांना अडकवले कोणी?

यापूर्वीच्या फडणवीस सरकारचा अजून एक निर्णय राज्यातील महाआघाडीच्या सरकारने रद्द केला आहे. राज्य शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागातील ब आणि क गटातील पदभरतीची परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे करण्यात येत होती. या  पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.  महाविकास आघाडीचे सरकार येताच हे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. हे  पोर्टल रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आज तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महाआयटीकडे ऑफलाईन पद्धतीने  चाचणी, टंकलेखन आदी परीक्षा घेण्याकरिता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने हे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ब आणि क गटाच्या पदभरतीची परीक्षा राबविण्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अशा सेवा देणा-या संस्थांची सूची करण्याची कार्यवाही महाआयटीमार्फत करण्यात यईल. त्यानुसार सूचीमधील निवड झालेल्या कंपन्यांकडून संबंधित विभागाच्या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. जाहिरात ते निवड प्रक्रिया या प्रक्रियेचे नियोजन संबंधित विभागाच्या स्तरावर होणार आहे. ज्या परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, त्या संबंधित विभागांना आवश्यक माहिती महाआयटीकडून हस्तांतरित करण्यात येणार आहे.