संजय दत्त चुकीचे वाजवत असतानाही लता मंगेशकर गात राहिल्या

Lata Mangeshkar - Sanjay Dutt

शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल हे काय? काहीही काय सांगता? संजय दत्त (Sanjay Dutt) काही तरी वाजवेल आणि त्यावर लता मंगेशकर (Lata Mangeshkar) गातील असे कधी तरी शक्य आहे का? तुमच्या मनात उद्भवलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. पण वास्तवात अशी घटना घडलेली आहे. एका कार्यक्रमात मंचावर संजय दत्त चुकीच्या पद्धतीने वाद्य वाजवत असतानाही लता मंगेशकरांनी त्याच्याकडे रागाने पाहिलेही परंतु आपले गाणे न थांबवता त्या गात राहिल्या. ही घटना आहे 1971 ची आणि स्वतः सुनील दत्त यांनीच याची माहिती दिली होती.

1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झाले. या युद्धात बांग्लादेशची निर्मिती झाली. यात भारताचा फार मोठा वाटा होता. त्यामुळे बांग्लादेशने भारतीय कलाकारांना कार्यक्रम सादर करण्यासाठी बांग्लादेशात येण्याचे आमंत्रण दिले होते. या कार्यक्रमाला सुनील दत्तही जाणार होेते. संजय दत्तला ही गोष्ट कळल्यानंतर त्यानेही त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट धरला होता. मात्र हा कलाकारांचा कार्यक्रम असल्याने कोणालाही घेऊन जाता येणार नाही. जो कोणी गात किंवा एखादे वाद्य वाजवत असेल त्यालाच घेऊन जाणार आहोत. तेव्हा संजय दत्तने तो बांगो वाजवण्यास शिकलो असून तेेथे मी बांगो वाजवेन असे सांगितले. त्यावर सुनील दत्त यांनी संजय दत्तला सोबत घेतले. कार्यक्रम सुरु झाला आणि लता मंगेशकर मंचावर येऊन गाऊ लागल्या. मात्र गाताना त्यांच्या लक्षात आले की, कोणी तरी चुकीचे वाद्य वाजवत आहे त्यामुळे त्यांना गाण्यात अडचण येऊ लागली. चुकीच्या तालाकडेच त्यांचे लक्ष जाऊ लागले. त्यांनी गाता गाता मागे वळून पाहिले तर संजय दत्त चुकीचे वाद्य वाजवत होता. ते पाहून लता मंगेशकर यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत गाण्यास सुरुवात केली आणि आपले गाणे पूर्ण केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER