‘तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत’ ; शहांच्या कोकण दौ-याची शिवसेनेने उडवली खिल्ली

Amit Shah - CM Uddhav Thackeray

मुंबई :- भाजपचे ज्येष्ठ नेते, देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौ-याची चर्चा चांगलीच गाजली होती. कॉंग्रेसमध्ये झालेल्या बदल पाहता अमित शहांच्या महाराष्ट्र दौरा महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) अधिकच धोक्याचा ठरेल असेच सर्वत्र पेरण्यात आले होते. याच मुद्द्याला घेऊन अमित शहांच्या कोकण दौ-याची शिवसेनेने सामनातून खिल्ली उडवली आहे.

स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून अशा भूमिकेत आमच्या जुन्या मित्रांनी स्वतःला रंगवून घेतले आहे. त्यांना शुभेच्छा व मानसिक शांततेसाठी प्रार्थनेचे बळ देण्याशिवाय दुसरे काय करू शकतो? महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी हरएक प्रयत्न झाले व सुरूच आहेत, ते नाकाम होतील. या प्रयत्नांत घटनात्मक पदावरील राज्यपालांची अप्रतिष्ठा केली गेली. महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांची नियुक्ती रोखली म्हणजे सरकारचा प्राण तडफडेल असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. या सर्व प्रकारात तुमचेच वस्त्रहरण झाले आहे. कोकणातही धुरळा उडविताना तेच घडले. तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत, तेथे देवादिकांचे काय घेऊन बसलात! अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनातून अमित शहांच्या दौ-यावर टिकास्त्र डागले.

अजून काय म्हटले आहे सामनात –

देशातील सर्व प्रश्नांचा निचरा झाल्यामुळे गृहमंत्री अमितभाई शहा हे रविवारी कोकण प्रांतात पायधूळ झाडून गेले. त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र भाजपातील एकजात सर्व मूळ पुरुष तसेच बाटगे मंडळ उपस्थित होते. अमितभाई हे बऱ्याच कालखंडानंतर महाराष्ट्रात अवतरल्याने ते काय बोलतात, काय करतात याकडे लोकांचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे अमित शहा यांनी धुरळा उडवला, पण त्यांचे विमान पुन्हा दिल्लीत उतरण्याआधीच धुरळा खाली बसला आहे. श्री. शहा नवीन असे काहीच बोलले नाहीत. त्यांनी तोच कोळसा उगाळून काय साधले? त्यांचा नेहमीचा यशस्वी मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार विश्वासघाताने आले आहे, सरकार तीनचाकी आहे वगैरे वगैरे. बंद खोलीत आपण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा कोणताही शब्द दिला नव्हता. दुसरे म्हणजे आपण जे करतो ते ‘डंके की चोट’पर करतो. बंद खोलीत कधीच काही करत नाही अशा गजाली त्यांनी कोकणात येऊन केल्या. त्यामुळे कुणाचे मनोरंजन झाले असेल तर माहीत नाही, पण महाराष्ट्राने या गजाली गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. बरे, बंद खोलीचे रहस्य याआधी भाजप पुढाऱ्यांनी अनेकदा मांडले आहे.

अनेक ‘बैठय़ा’ मुलाखतीत श्री. शहा यांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘बंद खोलीत काय घडले हे बाहेर सांगणे हा आपला संस्कार नाही.’’ मग आता कोकणच्या ‘जगबुडी’ नदीत त्या संस्काराचे विसर्जन का झाले? हे सर्व लोक या पद्धतीने ‘उचकले’ आहेत याचे एकमेव कारण महाराष्ट्राची सत्ता गमावल्याचे वैफल्य! भाजपच्या वागण्या-बोलण्यातून आता वैफल्य स्पष्टपणे दिसत आहे. ज्या वैद्यकीय कॉलेजचे उद्घाटन काल झाले, त्यात या आजारावर उपचार होतात काय ते पाहावे लागेल, पण महाराष्ट्रातून सत्ता उलथवून टाकल्याचा बाण काळजात घुसला आहे. त्या वेदनेतून सुरू असलेले हे उचकणे आहे. श्री. अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? एखाद्याच्या पायगुणात इतकी ताकद असती* तर हे महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. शर्थ आणि पराकाष्ठा करूनही ‘ठाकरे सरकार’ सत्तारूढ होण्यापासून कोणी रोखू शकले नाही. अमित शहा यांच्यात व शिवसेनेच्या कार्यपद्धतीत एक साम्य आहे. शिवसेनासुद्धा जे करते तेसुद्धा ‘डंके की चोट’पर करते. तसे नसते तर काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर उघडपणे सत्ता स्थापन केली नसती. आम्ही लपूनछपून काळोखात काही करत नाही, असे कोकणात सांगितले गेले. त्यावर कोकणातली भुतेही हसून नाचली असतील. असेही सामनात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER