कोणता मंत्री कुठे फिरतोय हे मुख्यमंत्र्यांनाही माहिती नसत – सुजय विखे

Sujay Patil-CM Thackeray

अहमदनगर : राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र, दुर्देवाने राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे येथे कोणत्या विभागाचा मंत्री कुठे फिरत आहे आणि काय निर्णय घेत आहे. याची माहिती मुख्यमंत्र्यांनासुद्धा नसते,’ असा खरमरीत टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह आघाडी लगावला. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आज विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली व करोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी सुजय विखे म्हणाले की, ‘राज्य सरकारकडे सध्या पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे ते रोज एक नवा नियम काढत आहेत. राज्याचे सचिव वेगळे नियम काढताना दिसून येत आहेत. मुख्यमंत्री वेगळा निर्णय घेऊन अध्यादेश काढतात. महसूलमंत्री वेगळाच निर्णय घेतात. तर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी एवढचं काय तर गावचे सरपंच सुद्धा वेगळाच नियम काढत आहेत. त्यामुळे राज्यात मंत्री लॉक झाले आणि जनता अनलॉक झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोण कुठे चालले, याचा कोणालाच काही पत्ता नाही,’ अशी टोलेबाजीही त्यांनी केली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्याला केंद्राच्या निधीतून ५० व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहेत. याशिवाय केंद्र सरकारकडून करोनाच्या अनुषंगाने राज्यातील रुग्णालयांना वेगवेगळे मेडिकल इक्यूमेंट दिले जात आहेत. पीपीई कीट दिले जात आहेत, मास्क दिले जात आहेत. रुग्णालयांसाठी इक्यूपमेंट देणे हे सुद्धा खर्चिक काम आहे. त्यामुळे राज्य सरकारला थेट आर्थिक साह्य करण्याची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, केंद्र सरकारकडून देण्यात आलेले व्हेंटिलेटर सदोष असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नगरमध्ये बोलताना केला होता. त्याबाबत विखे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी व्यवसायाने डॉक्टर आहे. मला व्हेंटिलेटरबाबत तसे काहीच जाणवले नाही. व्हेंटिलेटर सदोष असल्याचे ते कोणत्या निकषावर बोलत आहेत? त्यांच्याकडे तसा काही अहवाल आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. उलट ग्रामीण भागामध्ये जेवढे व्हेंटिलेटर आहेत, ते केंद्र सरकारच्या निधीतील असून ते लावल्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी आमच्यापर्यंत आली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER