अगदी सेम सेम!

Shashank Ketkar

आपण कितीही मोठे झालो तरी लहानपणीचे फोटो पाहिले की पुन्हा एकदा आपण त्या वयामध्ये जातो. आणि ते सगळे क्षण आनंदाने जगतो. त्यात भाऊ बहिणीचे फोटो मोठेपणी पाहताना एक वेगळीच धमाल येते. नुकतीच भाऊबीज झाली. सेलिब्रिटींनी त्यांच्या भावंडांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले. मात्र दिवाळीनंतर अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याने त्याच्या बहिणी सोबत चा एक अनोखा फोटो शेअर केला आहे. घराची आवराआवर करत असताना हा फोटो सापडला अशी ओळ लिहित त्याने लहानपणातल्या त्या फोटो सारखेच ड्रेस घालत तो क्षण पुन्हा एकदा जगला आहे.

सोशल मीडियावर (Social Media) सततऍक्टिव्ह असणाऱ्या अनेक कलाकारांपैकीच एक म्हणजे अभिनेता शशांक केतकर. वेगवेगळ्या सोशल मीडिया पेजवर तो सतत त्याच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटना फोटोच्या माध्यमातून शेअर करत असतो. इंडीड़ त्याचे हे युट्युब चॅनेल देखील त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मध्यंतरी डोंबिवलीमध्ये पिशव्या विकून आर्थिक गुजराण करणार्‍या आजोबांचा व्हिडिओ त्याने युट्युब चॅनेल वर पोस्ट केला होता आणि त्यानंतर त्या आजोबांना समाजातून मदतीचा प्रचंड ओघ आला. त्या आजोबांच्या घरी जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती. शशांक सोशल मीडियावर आता काय करणार पोस्ट करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेलं असतं.

दोन दिवसापूर्वी त्याच्या बहिणी सोबत आणि त्यांच्या लहानपणाच्या एका खेळण्या सोबतचा फोटो शेअर झाला. या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे, शशांक आणि त्याची बहीण साधारण दहा-बारा वर्षाची असताना ते ज्या खेळण्यांनी खेळत होते ते खेळणे देखील घराची आवराआवर करताना सापडलं . तो फोटो आणि फोटोतील टेडी वयाच्या या टप्प्यावर पाहताना त्याच्या आणि त्याच्या बहिणीला ते लहानपणीचे सगळे दिवस आठवले. मग त्यांनी एक मजा करायची ठरवली शशांक सांगतो, मी आणि माझ्या बहिणीने लहानपणी प्रचंड धमाल केली आहे. खूप मजा केली आहे. आमची खूप सारी खेळणी होती. अर्थात भावंड म्हटले की भांडण आलीच. त्यामुळे या फोटोत जे खेळणं दिसतय ते मिळवण्यासाठी आम्ही दोघ खूप भांडायचो. जेव्हा मला ते पाहिजे असायचं तेव्हा माझ्या बहिणीला देखील तेच टॉय हवं असायचं. दिवाळीच्या निमित्ताने घराची आवराआवर करत असताना आम्हा दोघांचा फोटो तर सापडलाच पण फोटोत दिसत असलेले खेळणे देखील सापडल्याने आम्हाला प्रचंड आनंद झाला.

या फोटोमध्ये शशांकने पिवळ्या रंगाचा टीशर्ट घातला आहे तर त्याच्या बहिणीने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे. खेळण्यासोबत मजा मस्ती करत असतानाचा आणि हसतानाचा लहानपणीचा फोटो बघून तशाच पोझ मधला फोटो आता काढून दोन फोटो एकत्रित रित्या सोशल मीडियावर शेअर करण्याची कल्पना शशांकला सुचली. अशा वेगवेगळ्या कल्पना त्याला नेहमी सुचत असतात. मध्यंतरी त्याने पत्नी प्रियांकासाठी एक भेटवस्तू ऑनलाईन ऑर्डर केली होती. आणि ती छोटीशी क्रिमची डबी पॅकिंग करणाऱ्यांनी भल्यामोठ्या बॉक्स मधून पैक करून पाठवली होती. बॉक्स फोडून डबी पर्यंत पोहोचतानाची सगळी प्रक्रिया शशांकने व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टा पेजवर शेअर केली होती. शशांक असं नेहमी करत असतो. त्यामुळे बहिणी सोबत आणि त्या खेळण्यासोबतचा लहानपणीचा फोटो जसाच्या तसा क्लिक करण्यासाठी शशांक आणि त्याच्या बहिणीने तशाच रंगाचे ड्रेस घातले आणि मग त्याच पोझमध्ये लहानपणीचा फोटो पुन्हा एकदा क्लिक झाला.

वयाने कितीही मोठे झालो तरी जेव्हा लहानपणीच्या आठवणी येतात तेव्हा आपण नेहमीच लहान होतो हेच या फोटोतून शशांकने आणि त्याच्या बहिणीने दाखवून दिले आहे.

नुकतीच शशांकची, सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका संपली असून सध्या तो निवांत आहे. आणि यंदाची दिवाळी देखील आनंदात साजरी केली. मध्यंतरी त्याला कोरोनाची लागण झाली होती. सुखाच्या सरिनी हे मन बावरे ही मालिका शेवटच्या टप्प्यावर आली असताना शशांक कोरोनाशी लढा देत होता . मात्र कोरोनावर मात करत त्याने ही मालिका पूर्ण केली.

ही बातमी पण वाचा : फोटोसाठी निरंजनने केली मेकअप रूमची सफाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER